नवी दिल्ली – सोशल मीडियावरील फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप हे अॅप्स सोमवारी रात्री ठप्प पडले आणि जगात एकच खळबळ उडाली. त्यानंतर ट्विटरवर युजर्सच्या प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडला. हे अॅप्स जवळपास सहा तास बंद होते. त्यामुळे जगातील सर्वच युजर्सना समस्यांचा सामना करावा लागला. या विरोधात १.०६ कोटी युजर्सनी तक्रार केली. या आउटेजचा फटका दस्तुरखुद्द फेसबुकच्या कर्मचाऱ्यांनाही बसला. आउटेजदरम्यान फेसबुकचे कर्मचारी कार्यालयातच प्रवेश करू शकले नाहीत. कारण त्यांच्या प्रवेशाचा अॅक्सेस थांबला होता. याचे सर्व्हर सुद्धा फेसबुकच्या सर्व्हरद्वारे काम करते.
जगभरात युजर्ससाठी फेसबुक, मॅसेंजर, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामसारखे अॅप्स सहा तास ठप्प होते. परंतु फेसबुकच्या इंजिनिअरिंग टीमने अधिकृतरित्या सांगितले, की त्यांची सेवा जवळपास २.५ तास बंद होती. गेल्या चार वर्षांतील हा सर्वात मोठा आउटेज असून, यासाठी आम्ही माफी मागतो, असे फेसबुकने म्हटले आहे. हा आउटेज नेमका का झाला आणि यातून आम्ही काय शिकलो याबद्दलची तांत्रिक माहिती आम्ही द्यायची आहे, असे फेसबुकने सांगितले.
नेमके काय झाले
फेसबुक सांगते, की स्वयंचलित कॉन्फिग्रेशन व्हेरिफाय दरम्यान ही समस्या उद्भवली. कॉन्फिग्रेशन दरम्यान दोन डाटा सेंटर एकमेकांना जोडलेले असतात. अनावश्यक कॅशेला तपासून नव्या कॅशला अपडेट केले जाते. त्याला सलग चुकीच्या कमांड मिळाल्या तर कॅशे काम करत नाही. आजच आम्ही कॉन्फिग्रेशनबाबत बदल केले होते. त्यााला बॅकबोन राउटरने रिजेक्ट केले. त्यामुळेच संपूर्ण जगातील युजर्सना समस्यांचा सामना करावा लागला. प्रत्येक युजरला इनव्हॅलिड असा रिझल्ट मिळत होता. त्यामुळे युजर्सना एरर येत होता. डाटा सेंटरपर्यंत कमांड पोहोचूच शकले नाहीत. त्यामुळे साइटची पूर्ण ट्रॅफिकच बंद करावी लागली. दोन डाटा सेंटरच्या मध्ये कॉन्फिग्रेशन पुलाचे काम करते.
फेसबुकचे किती नुकसान
सहा तासांच्या या आउटेजमुळे फेसबुकचे दर तासाचे जवळपास ७.४५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गच्या वैयक्तिक संपत्तीत ६ बिलियन डॉलर म्हणजेच ४४,७९० कोटी रुपयांहून अधिक घट झाली आहे. त्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते एक पायरी खाली घसरले आहेत. तसेच फेसबुकचे शेअर्स ४.९ टक्क्यांची घसरले आहेत.