मुंबई – दरवर्षी दिवाळीपूर्वी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसह अनेक ई कॉमर्स कंपन्यांच्या संकेतस्थळांवर फेस्टिव्ह सेलचे आयोजन केले जाते. एखादी वस्तू सर्वात स्वस्त मिळेल असा दावा अशा सेलमध्ये केला जातो. आपल्यापैकी बहुतांश ग्राहक अशा फेस्टिव्ह सेलची वाट पाहात असतात. अॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल आणि फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. त्यामध्ये आयफोन सर्वात कमी किमतीत विक्री करण्यात आला. फेस्टिव्ह सेलमध्ये बहुतांश ग्राहक प्रीमियम प्रॉडक्ट खरेदी करण्याचा प्रयत्न करत असतात. पण फेस्टिव्ह सेलमध्ये खरी सवलत मिळती का, हे कोणालाच ठाऊक नसते. आपण याबद्दल जाणून घेऊयात.
या महिन्यात फेस्टिव्ह सेलमध्ये अॅमेझॉनवर iPhone 11 फक्त ३८,९९९ रुपयांच्या किमतीत विक्री झाला. आता सेल संपल्यानंतर आयफोन ११ ची किंमत ४१,९९९ रुपये झाली आहे. म्हणजेच फेस्टिव्ह सेलमध्ये हा फोन ३ हजार रुपये स्वस्त विक्री झाला. याच वर्षी होळी सणादरम्यान आयफोन ११ हा ४१,९०० रुपयांमध्ये विक्री झाला होता. आयफोन १३ च्या अनावरणानंतर अॅपल कंपनीने बहुतांश आयफोन १२ सीरिजच्या फोनच्या किमतीत कपात केली होती. परंतु फेस्टिव्ह सेलमध्ये आयफोन १२ ची खूपच कमी किमतीत विक्री झाली आहे.
अॅपलच्या अधिकृत कपातीनंतर iPhone 12 च्या ६४ जीबी फोनची किंमत ६५,९०० रुपये झाली होती. परंतु अॅमेझॉनच्या फेस्टिव्ह सेलमध्ये आयफोन १२ चा बेसिक व्हेरिएंट ४८,९९९ रुपयांमध्ये विक्री करण्यात आला. तर फ्लिपकार्टच्या सेलमध्ये आयफोन १२ चा बेसिक व्हेरिएंट ५२,९९९ रुपयांमध्ये विक्री करण्यात आला होता. सेल संपल्यानंतर तो ५३,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर अशा सेलमध्ये एक हजार रुपयांचीच सवलत देण्यात आली.
याच वर्षी एप्रिलमध्ये फ्लिपकार्टवर Flipkart Flagship Fest सेलचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रीमियम स्मार्टफोनवर ४० हजार रुपयांपर्यंत सवलत देण्यात आली होती. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये आयफोन ११ हा ४८,९९९ रुपयांमध्ये ठेवण्यात आला होता. तसेच iPhone XR हा फोन ३९,९९९ रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला होता. तुलना केली तर आता आयफोन ११ हा ४१,९९९ रुपयांत खरेदी केला जाऊ शकला असता.
एकूणच सगळा व्यवहार पाहिला तर फेस्टिव्ह सेलमध्ये सर्व वस्तूंवर थेट सवलत मिळत नाही. प्रीमियम प्रॉडक्टवर थेट सवलत मिळते. तर मध्यम रेंजमध्ये असलेल्या वस्तूंवर चांगली ऑफर मिळते. फेस्टिव्ह सेलमध्ये फसवणुकीचा धोका जास्त असतो. खूपच सावध राहून खरेदी करावी लागते. संबंधित वस्तूंची किंमत अधिकृत संकेतस्थळावर खात्री करूनच ती घ्यावी हेच योग्य ठरेल.