विशेष प्रतिनिधी, मुंबई
प्रसिद्ध रिएलिटी शो इंडियन आयडॉल अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांचे पुत्र अमित कुमार यांनी या शोबाबत अनेक मोठे खुलासे केले होते. सगळ्यांचे कौतुक करावे असे मला सांगितले गेले, किशोरदा यांना श्रद्धांजलीपर गीत गाणार असल्याने ते कसेही गायले तरी त्यांना प्रोत्साहन द्यायचे आहे, असे सांगितले गेले. मला जे सांगितले गेले, मी तेच केले, असे अमित कुमाल म्हणाले. त्यानंतर होस्ट आदित्य नारायण याने अमित कुमार यांची थट्टासुद्धा केली होती. नंतर गायक अभिजित सावंत याने शोमधील ड्रामे आणि स्पर्धकांबद्दल वक्तव्य केले. या अशा अनेक वादांमुळे इंडियन ऑयडलला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनीही स्पर्धकांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
एका खासगी वाहिनीशी बोलताना अनुराधा पौडवाल म्हणाल्या, मला सर्वच स्पर्धक एकापेक्षा एक सरस वाटले. यामध्ये कोणताही वाद नव्हता. लोक त्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतील तर मला आश्चर्य वाटत आहे. मला अमितजी यांच्या वादाबाबत काहीच माहिती नाही. जेव्हा मी शोमध्ये गेले तेव्हा मुले खूप सुंदर गायली. त्यांचे गायन ऐकून मला तर आश्चर्यच वाटले, असे त्या म्हणाल्या.
इंडियन आयडॉलच्या निर्मात्यांना स्पर्धकांच्या बूट पॉलिश करण्यावर, त्यांची गरिबी आणि भूक दाखवण्यावर जास्त रस आहे, असा आरोप इंडियन आयडॉलचा माजी स्पर्धक गायक अभिजित सावंत याने केला आहे. प्रादेशिक रिएलिटी शोमध्ये स्पर्धकांच्या खासगी बाबी दाखविल्या जात नाहीत. त्यांचे सगळे लक्ष गायनावरच केंद्रित असतो. परंतु राष्ट्रीय रिएलिटी शोमध्ये बूट पॉलिश करण्याची गोष्ट, त्यांचे आई-वडील गरीब परिस्थितीत राहात असल्याचे दाखविणे यावरच भर असतो. आता तर खोटी लव्हस्टोरी दाखविण्यावर जास्त भर दिला जात आहे, असा आरोप अभिजित सावंत याने केला.