इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी ईशान्य भारतातील गुंतवणूक ७५ हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. सध्या या भागात कंपनीने सुमारे ३० हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. याचा अर्थ पुढील पाच वर्षांत रिलायन्स या राज्यांमध्ये सुमारे ४५ हजार कोटी रुपयांची नव्याने गुंतवणूक करणार आहे. ते दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित ‘रायझिंग नॉर्थईस्ट इन्व्हेस्टर्स समिट’मध्ये बोलत होते.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाबद्दल आणि सशस्त्र दलांच्या शौर्याला सलाम करत, अंबानींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशवासीयांचे अभिनंदन करत आपल्या भाषणाची सुरुवात केली.
मुकेश अंबानी यांनी सांगितले की, प्रस्तावित गुंतवणुकीमुळे २५ लाखांहून अधिक थेट आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील. या राज्यांमध्ये ३५० बायोगॅस प्रकल्प उभारण्याचीही कंपनीची योजना आहे. जिओ नेटवर्कविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, रिलायन्स जिओचे ५जी नेटवर्क ईशान्य भारतातील सुमारे ९० टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचले आहे. सध्या ५० लाख लोक जिओ ५जी नेटवर्कशी जोडले गेले असून, ही संख्या यावर्षी १ कोटींपर्यंत जाईल.
शेती उत्पन्न वाढवण्यासाठी रिलायन्स रिटेल शेतकऱ्यांकडून थेट खरेदीला प्रोत्साहन देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांच्या कार्यप्रदर्शनाचे कौतुक करताना अंबानी म्हणाले, “आपल्या प्रयत्नांमुळे ईशान्य भारत आता मुख्य प्रवाहात आला असून, देशाच्या विकासाच्या नकाशावर ठळकपणे उमटला आहे.”
आरोग्य क्षेत्रातील योगदानाबाबत बोलताना त्यांनी नमूद केले की, रिलायन्स फाउंडेशनने मणिपूरमध्ये १५० खाटांचे कॅन्सर रुग्णालय स्थापन केले आहे. स्तन कर्करोगाच्या उपचारांसाठी मिजोराम विद्यापीठासोबत जीनोमिक डेटाच्या आधारे सहकार्य सुरू आहे. गुवाहाटीमध्ये अॅडव्हान्स मॉलिक्युलर डायग्नोस्टिक आणि रिसर्च लॅबही उभारण्यात आली असून, ती भारतातील सर्वात मोठ्या जीनोम सिक्वेन्स क्षमतेने सुसज्ज असेल.
उत्तर-पूर्वेतील सर्व आठ राज्यांमध्ये रिलायन्स फाउंडेशनच्या सहकार्याने ऑलिंपिक प्रशिक्षण केंद्र स्थापन केली जाणार असून, यामधून उदयोन्मुख खेळाडू ऑलिंपिकमध्ये पदके जिंकू शकतील.