जयपूर (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – प्रत्येकाच्या जीवनाचा स्तर सुधारण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो. कारण चांगल्या-वाईट गोष्टींचा विचार करण्याची क्षमता आई-वडिलांनंतर शिक्षकच विकसित करतात. त्यामुळे गुरूंविषयी सगळे आदर व्यक्त करत असतात. विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी नुकताच आपल्या गुरूंचा केलेला सन्मान संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरला आहे.
आगळावेगळा समारंभ
राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील शिक्षक भंवरलाल शर्मा वीस वर्षे शिक्षकाची नोकरी करून नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाबद्दल देशात चांगलीच चर्चा झाली. या कार्यक्रमात शर्मा यांची हत्तीवर मिरवणूक काढून त्यांना विद्यार्थिनी आणि ग्रामस्थांनी आगळावेगळा निरोप दिला. या निरोप समारंभात निर्माण झालेल्या भावूक क्षणांमुळे सर्व विद्यार्थिनी आणि ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी तरळले. जवळपास सर्वच ग्रामस्थ ढसाढसा रडले.
गुरूंचा सन्मान करणारा हा अनोखा कार्यक्रम भिलवाडा जिल्ह्यातील शाहपुरामधील अरवाड गावात झाला. अरवाड गावातील सरकारी शाळेत असलेले शिक्षक भंवरलाल शर्मा यांचा ३१ डिसेंबर २०२१ रोजी सेवानिवृत्तीनिमित्त ग्रामस्थांनी निरोप समारंभ ठेवला होता. ग्रामस्थांनी शर्मा यांची हत्तीवर बसवून पूर्ण गावात मिरवणूक काढली. निरोपाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
२० वर्षांपासून ज्ञानदान
अरवाड येथील सरकारी शाळेत भंवरलाल शर्मा हे २० वर्षांपासून शिकवत होते. यादरम्यान ८ महिन्यांसाठी त्यांची दुसर्या शाळेत बदली करण्यात आली होती. परंतु तरीही ते दररोज अरवाडच्या शाळेतील विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी येत होते. विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा त्यांच्याबद्दल खूपच जिव्हाळा निर्माण झाला होता. भंवरलाल शर्मा यांनीसुद्धा आपल्या खर्चातून गावातील मुलांना कॉम्प्युटरच्या शिक्षणासाठी दोन लाख रुपये दान केले होते.
आदर्श शिक्षक
शर्मा यांच्या निरोपाच्या दिवशी ग्रामस्थांनी कवी सम्मेलन आयोजित केले होते. त्यामध्ये अनेक प्रसिद्ध कवींना बोलावण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रमाचा खर्च सर्व ग्रामस्थांनी मिळून केला होता. ग्रामस्थांबद्दल शिक्षकाप्रती इतके प्रेम होते की संपूर्ण गाव त्यांना आदर्श मानते. गावातील बहुतांश मुलांनी त्यांच्याकडून शिक्षण घेतले आहे.