मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतातील निवासी रिअल इस्टेट विक्रीने वार्षिक ५० टक्क्यांच्या वाढीसह २०२१ मधील पातळीला बरेच मागे टाकले आहे. २०२२ दरम्यान नवीन सादरीकरणांमध्ये प्रबळ वाढ झाली आणि कॅलेंडर वर्ष २०२२ दरम्यान ४,३१,५१० नवीन घरांच्या सादरीकरणासह वार्षिक १०१ टक्के वाढीची नोंद केली, असे देशातील अग्रगण्य ऑनलाइन रिअल इस्टेट ब्रोकरेज कंपनी प्रॉपटायगर डॉटकॉमच्या नवीन अहवालामध्ये म्हटले आहे.
रिअल इनसाइट रेसिडेन्शियल – अॅन्युअल राऊंड-अप २०२२ (जानेवारी – डिसेंबर) अहवालानुसार २०२१ मध्ये विक्री करण्यात आलेल्या २,०५,९४० सदनिकांच्या तुलनेत २०२२ मध्ये एकूण ३,०८,९४० सदनिकांची विक्री करण्यात आली. या आकडेवारीमध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, दिल्ली-एनसीआर (गुरूग्राम, नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद व फरिदाबाद), एमएमआर (मुंबई, नवी मुंबई व ठाणे) आणि पुणे या अव्वल आठ शहरांसाठी दोन्ही कॅलेंडर वर्षांमधील चारही तिमाहींकरिता विक्री आकडेवारींचा समावेश आहे.
२०२२ मध्ये एकूण ४,३१,५१० सदनिका सादर करण्यात आल्या, ज्यामध्ये २०२१ च्या तुलनेत वार्षिक १०१ टक्क्यांची मोठी वाढ झाली. नवीन सादरीकरणांमध्ये २०१५ मधील पातळ्यांच्या तुलनेत बहुवार्षिक उच्च ६ टक्क्यांची वाढ झाली. २०२२ मध्ये नवीन पुरवठ्यासंदर्भात मुंबई अग्रस्थानी राहिले आहे, जेथे एकूण सादरीकरणांमध्ये ३९ टक्क्यांचा हिस्सा आहे. यानंतर पुणे व हैदराबाद यांचा क्रमांक होता, ज्यांचा हिस्सा अनुक्रमे १८ टक्के व १९ टक्के होता.
२०२२ मध्ये मुंबई, पुणे मालमत्ता मागणीमध्ये अग्रस्थानी:
२०२२ साठीचा डेटा व माहितीमधून निदर्शनास येते की, वर्षाच्या चारही तिमाहींमध्ये मागणी क्रमिक आणि वार्षिक अशा दोन्ही स्वरूपात वाढली आहे. २०२२ मध्ये एकूण विक्रीत ५६ टक्के एकत्रित हिस्सासह मुंबई आणि पुणे या पश्चिमेकडील बाजारपेठांनी गृहखरेदीदारांचे लक्ष वेधून घेतले.
विक्रीचा सर्वात मोठा हिस्सा (२६ टक्के) ४५ लाख ते ७५ लाख रूपयांच्या श्रेणीमध्ये होता. उल्लेखनीय बाब म्हणजे १ कोटी रूपयाहून अधिक किंमतीमधील सदनिकांचा हिस्सा सतत वाढत आहे. या किंमतीच्या श्रेणीचा हिस्सा २०२२ मध्ये २२ टक्के होता, जो दशकामधील सर्वोच्च आहे. २०२२ मध्ये २१ टक्के सदनिका रेडी-टू-मूव्ह स्थितीत विकण्यात आल्या, तर उर्वरित ७९ टक्के सदनिकांचे बांधकाम सुरू होते.
२०२२ च्या चौथ्या तिमाहीमध्ये निवासी मागणी २०१९ च्या महामारीपूर्वीच्या पातळ्यांइतकी होती. २०२२च्या अंतिम तिमाहीमध्ये ८०,७७० सदनिकांच्या विक्रीसह मागणीने २०२१ च्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत १९ टक्के वाढीची नोंद केली. मालमत्ता किंमती व व्याजदरांमधील वाढीचा हळूहळू गृहखरेदीदारांच्या भावनेवर काही प्रमाणात परिणाम होण्यासोबत लघुकालीन परिणाम होण्याची अपेक्षा असताना देखील ग्राहक दृष्टिकोन सकारात्मक राहिल.
गृहखरेदीदारांच्या भावनेमुळे नवीन सादरीकरणाला चालना:
महामारीनंतर ग्राहकांमध्ये घराच्या मालकीकडे पाहण्याच्या दृष्टीकोनातील स्पष्ट परिवर्तनामुळे भागधारकांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे आणि भारतातील प्रमुख शहरांमधील रिअल इस्टेट विकासकांना २०२२ मध्ये नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.
२०२२ मध्ये अधिकतम नवीन पुरवठ्याची किंमत १ कोटी ते ३ कोटी रूपयांमध्ये होती, ज्यांचा एकूण सादरीकरणांमध्ये २८ टक्के हिस्सा होता. ४५ लाख ते ७५ लाख किंमत श्रेणीमधील सदनिकांचा देखील लक्षणीय हिस्सा (२७ टक्के) होता. २०२२ च्या चौथ्या तिमाहीमध्ये १,४५,०३० सदनिका सादर करण्यात आल्या, ज्यामध्ये वार्षिक ९५ टक्के वाढीची नोंद करण्यात आली. २०२२ मध्ये सलग तिसऱ्या तिमाहीसाठी नवीन सादरीकरणांची आकडेवारी १,००,००० पेक्षा अधिक आहे.
‘‘उद्योगासमोर अनेक आव्हाने असूनही या वर्षी घरांच्या विक्रीत प्रबळ वाढ झाली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, उद्योगामध्ये अधिक मागणी आणि अनुकूल भावना दिसून येत आहे. गृहकर्जाच्या व्याजदरांमध्ये स्थिर चढ-उतार होत असताना देखील ग्राहक तारण व्याजदरांबद्दल घाबरून न जाता कमी किंमतीच्या गृहखरेदीप्रती रूची दाखवत आहेत. ही बाब आमच्या कंझ्युमर सेन्टिमेंट सर्व्हेमधून देखील दिसून आली आहे. या सर्वेक्षणामधून निदर्शनास आले की, गृहखरेदीदार २०२२ मध्ये अर्थव्यवस्था आणि त्यांच्या भावी कमाईबाबत सकारात्मक राहिले आहेत,’’ असे हाऊसिंग डॉटकॉम, प्रोपटायगर डॉटकॉम आणि मकान डॉटकॉमचे समूह मुख्य वित्तीय अधिकारी श्री. विकास वाधवान म्हणाले.
श्री. वधवान पुढे म्हणाले, ‘‘गृहनिर्माण, कार्यालय, किरकोळ, वेअरहाऊस, डेटा सेंटर्स, को-वर्किंग आणि को-लिव्हिंग यासह सर्व विभागांमध्ये आम्ही मजबूत वाढ पाहिली आहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. रेरानंतरच्या जगात एनआरआयची भारतीय मालमत्तेप्रती मागणी देखील वाढली आहे आणि द्वितीय श्रेणीच्या बाजारपेठांना देखील चालना मिळाली आहे.’’
Real Estate Sector Property 2023 Year Survey Report