मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील प्रमुख आठ शहरांतील गृहविक्रीत गेल्यावर्षीच्या तुलनेत जुलै ते सप्टेंबर या तिमाहीदरम्यान ५ टक्क्यांची घसरण झाली असून नवीन लॉन्चमध्ये ही या तिमाहीत २५ टक्क्यांची घट झाली आहे. घरांच्या किंमतीत झालेल्या तीव्र वाढीमुळे ही घट झाल्याचे प्रॉपटायगर डॉटकॉमच्या ‘रियल इनसाइट रेसिडेन्शियल रिपोर्ट’मधून निदर्शनास आले आहे. प्रॉपटायगर डॉटकॉम हा हाऊसिंग डॉटकॉमचे स्वामित्व असणाऱ्या आरईए इंडियाचाच एक भाग आहे.
या अहवालातील प्रमुख निष्कर्ष पाहिल्यास दिसून येते की २०२३ मध्ये या तिमाहीत १,०१,२२१ घरांची विक्री झाली होती, ज्यामध्ये ५ टक्के वार्षिक घट होऊन २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत एकूण ९६,५४४ घरांची विक्री झाली आहे. तर देशातील प्रमुख शहरांत तिसऱ्या तिमाहीत ९१,८६३ नवीन घरे लॉन्च झाली, जी २०२३ च्या तिसऱ्या तिमाहीत झालेल्या १,२३,०८० घरांच्या लॉन्चच्या तुलनेत तब्बल २५ टक्क्यांनी कमी आहेत.
प्रॉपटायगर डॉटकॉमचे बिझनेस हेड आणि आरईए इंडियाचे सीएफओ विकास वधावन म्हणाले, “विक्री आणि नवीन लॉन्च या दोन्ही बाबतीत गेल्या वर्षाच्या तुलनेत झालेली घट हा वाढत्या किंमतींना मार्केटने दिलेला प्रतिसाद आहे. एप्रिल-जून तिमाहीदरम्यान सामान्य निवडणुकींमुळे घरांची मागणी आणि पुरवठा थंडावला होता आणि जुलै-ऑगस्ट दरम्यान मंजुरीची प्रक्रिया तात्पुरती मंद झाली होती पण ग्राहकांच्या दृष्टिकोनातील सकारात्मकता टिकून आहे. ही बाजारपेठ मूलभूत गोष्टींनी प्रेरित आहे, त्यामुळेच गुंतवणुकीचा एक मार्ग म्हणून रियल इस्टेटला लोकांची पसंती असते.”
ते पुढे म्हणाले, “मार्केटच्या कामकाजात आम्ही एक निरोगी संयम बघत आहोत, जो अंतिम यूझरसाठी लाभदायी आहे, कारण त्याच्यामुळे स्थायी विकास संभव होतो. गेल्या काही तिमाहींमध्ये मुख्य बाजारपेठांच्या काही उत्तम भागांमध्ये किंमतीत 3% ते 50% इतकी प्रचंड वाढ झाली आहे. त्याच्यामुळे खरेदी करण्याच्या निर्णयावर परिणाम झाला आहे. पण आम्हाला आशा आहे की, खरेदीदार हळूहळू नवीन किंमती स्वीकारतील. नवरात्रीपासून सणासुदीची सुरुवात उत्साहात झाली आहे, त्यामुळे खरेदीदारांचे खरेदीतील स्वारस्य नव्याने वाढेल आणि विक्री वाढेल अशी आशा आहे. मार्केटमधली तेजी मंदावली आहे आणि एंड-यूझर्ससाठी अधिक स्थिर वातावरण निर्माण झाले आहे. विशेष करून हैदराबाद आणि पुणे येथील विकासकांनी मागणी प्रकारातील बदल ध्यानात घेऊन पुरवठ्याच्या धोरणात बदल केला आहे, तर दिल्ली एनसीआरमध्ये विक्री आणि नवीन लॉन्च बाबतीत दमदार हालचाल दिसत आहे. सणासुदीचा मोसम नवी ऊर्जा घेऊन येईल अशी अशा आहे. कारण, विकासक आकर्षक ऑफर्स देत आहेत त्यामुळे अलीकडे आव्हाने आलेली असली तरी मार्केट लवकरच पुन्हा गजबजेल.”
मुंबई, हैदराबाद आणि पुण्यात मोठी घसरण:
२०२४ च्या जुलै-सप्टेंबर या तिमाहीत दिल्ली एनसीआरमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत विक्रीत २९% ची लक्षणीय वाढ झालेली दिसली आणि गेल्या वर्षातील याच कालावधीत ७,८०० घरांच्या विक्रीच्या तुलनेत यंदा त्या तिमाहीत १०,०९८ घरांची विक्री झाली. एकंदर संख्येच्या बाबतीत मुंबई आघाडीवर असली तरी, २०२३ मधल्या तिसऱ्या तिमाहीत ३०,२९९ घरांच्या विक्रीच्या तुलनेत यंदा मामुली १% घट होऊन ३०,०१० घरांची विक्री झाली. हैदराबादमध्ये मोठी घट झालेली दिसत आहे. गेल्यावर्षी १४१९१ घरांच्या विक्रीसमोर यंदा ११,५६४ घरांची विक्री झाली आहे. अशाप्रकारे विक्रीत १९% घट आली आहे. बंगळूरमधील विक्री ११% ने कमी झाली आहे, गेल्या वर्षी या तिमाहीत १२,५८८ घरांची विक्री झाली होती तर २०२४च्या या तिमाहीत मात्र ११,१६० घरेच विकली गेली. त्याचप्रमाणे, अहमदाबादेत गेल्या वर्षीच्या तुलनेत ९% घट होऊन घरांच्या विक्रीची संख्या गेल्या वर्षीच्या १०,३०५ वरून ९,३५२ वर आली आहे.
नवीन लॉन्चची तुलना:
२०२३ च्या तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत दिल्ली एनसीआरमध्ये नवीन लॉन्चच्या बाबतीत ७६% इतकी दमदार वाढ झालेली दिसली. मागच्या वर्षांच्या ६८१० घरांच्या तुलनेत यंदा तब्बल ११,९५५ नवी घरे लॉन्च झाली. यामधून विकासकांचा जबरदस्त आत्मविश्वास दिसून येतो. याच्या उलट, नवीन घरांच्या पुरवठ्याच्या बाबतीत मुंबईत १३% घट झालेली दिसली. गेल्या वर्षीच्या ३५,९२३ घरांच्या तुलनेत यंदा ३१,१२३ घरे लॉन्च झाली आहेत. हैदराबाद येथे गेल्या वर्षाच्या तुलनेत ५८% इतकी तीव्र घट झाली आहे. नवीन लॉन्च होणाऱ्या घरांची संख्या मागील वर्षी २०,४८१ होती तर यंदा ती फक्त ८,५४६ इतकी आहे. पुण्यातील नवीन घरांचा पुरवठा देखील ३६%ने कमी होऊन ३१,५४३ वरून २१,२८७ वर आला आहे. कोलकाता येथे मागील तिमाहीच्या तुलनेत वाढ झालेली असली तरी मागील वर्षातील याच तिमाहीच्या तुलनेत ६१% ची घट झाली आहे. २०२३ च्या तिसऱ्या तिमाहीत ३,८५० नवी घरे लॉन्च झाली होती तर यंदाच्या तिमाहीत फक्त १,५१६ नवीन घरे लॉन्च झाली आहेत.