मुंबई – एटीएममध्ये वेळेत पैसे भरले नाही, तर संबंधित बँकेला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावणार असल्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला आहे. एटीएममध्ये रोख रक्कम नसल्याने अनेक ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. या निर्णयामुळे ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. महिन्यात एका एटीएममध्ये दहा तासांहून अधिक वेळेपर्यंत पैसे भरले गेले नाहीत, तर दंड लावला जाणार आहे, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, एटीएम मशिनमध्ये पुरेशा प्रमाणात रोख रक्कम उपलब्ध व्हावी हे सुनिश्चित करण्याचा या दंडामागे उद्देश आहे. कोणत्याही एटीएममध्ये जर दहा तासांहून अधिक वेळेपर्यंत रोख नसेल तर संबंधित बँकेना प्रति एटीएम दहा हजार रुपये दंड भरावा लागेल. रोकड एटीएममध्ये वेळेत भरणा केली जावी तसेच ग्राहकांना त्रास सहन करावा लागू नये, हे व्हाइट लेबल एटीएम संचालकांना सुनिश्चित करावे लागेल. व्हाइटलेबल एटीएमच्या प्रकरणांमध्ये रोकड पुरवठा करणार्या संबंधित बँकेला दंड लावला जाणार आहे. व्हाइटलेबल एटीएमच्या संचालक गैरबँक कंपन्या असतात.