नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय रिझर्व्ह बँकेच्या सर्व प्रयत्नांनंतरही देशात महागाई नियंत्रणात नाही. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वाढत्या महागाईची कारणे सांगितली आहेत. यासोबतच रुपया, डिजिटल चलन, परकीय चलनाचा साठा यासह अर्थव्यवस्थेशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली.
शक्तीकांत दास म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्था तणावाच्या काळातून जात आहे. या परिस्थितीला त्यांनी प्रामुख्याने ३ कारणे दिली आहेत. कोविड महामारी, युक्रेन-रशिया यांच्यातील युद्ध आणि आर्थिक बाजार यामुळे भारतासह जागतिक अर्थव्यवस्था तणावाखाली आहे. दास यांच्या म्हणण्यानुसार, सध्या देशाच्या GDP वाढीचे आकडे ठीक आहेत. भारताची अर्थव्यवस्था जागतिक स्तरापेक्षा वेगाने वाढत आहे. महागाईचे आकडेही आता हळूहळू आटोक्यात येत आहेत.
सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरची महागाईची आकडेवारी दिलासा देणारी ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई ७% च्या खाली राहण्याची शक्यता आहे. जर सलग तीन तिमाहीत चलनवाढीचा दर ६% च्या वर असेल तर ते चलनविषयक धोरणाचे अपयश आहे. रिझव्र्ह बँक कायद्यानुसार, चलनवाढीचे निश्चित केलेले उद्दिष्ट सलग तीन तिमाहीत गाठले गेले नाही, तर रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला कारण आणि महागाई रोखण्यासाठी उचललेल्या पावलांची तपशीलवार माहिती देणारा अहवाल द्यावा लागेल. २०१६ मध्ये चलनविषयक धोरण आराखडा अंमलात आल्यानंतर पहिल्यांदाच केंद्र सरकारला अहवाल सादर करावा लागला आहे.
दास म्हणाले की, यावेळीही आपल्या परकीय चलनाचा साठा खूप चांगल्या स्थितीत आहे. बदलत्या जागतिक परिस्थितीमुळे रुपया कमजोर झाला आणि केंद्रीय रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपाची गरज होती. जग बदलत आहे. व्यवसाय करण्याची पद्धत बदलत आहे. काळाशी ताळमेळ राखावा लागेल. कागदी नोटांची छपाई, छपाईचा खर्च, कागदाची खरेदी, रसद, साठवणूक इत्यादींचा खर्च जास्त असतो. पुढे जाऊन डिजिटल चलन कमी महाग होईल. क्रॉस बॉर्डर व्यवहार आणि सीमापार पेमेंटसाठी हे खूप महत्वाचे असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
https://twitter.com/RBI/status/1591352829003714560?s=20&t=hVcAPxjMnCKVkshQIhgTrg
RBI Governor on India Inflation Control Efforts