मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेबद्दल अतिशय कठोर निर्णय घेतला आहे. ही सहकारी बँक पुण्यातील असून तिचे नाव शिवाजीराव भोसले सहकारी बँक असे आहे. या बँकेचा परवाना आरबीआयने रद्द केला आहे.
रिझर्व्ह बँकेने अतिशय गंभीर दखल घेत तत्काळ आदेश काढून बॅंकेचा परवाना रद्द केला आहे. या बँकेच्या आर्थिक स्थिती संदर्भात राज्याच्या सहकार विभागाने रिझर्व्ह बँकेकडे शिफारस केली होती की शिवाजीराव भोसले बँकेचा परवाना रद्द करावा. तसेच, या बँकेकडे नसलेले पुरेसं भांडवल, उत्पन्नाचे आटलेले स्त्रोत, बँकेतील विविध आर्थिक अनियमिता या सर्वांची दखल रिझर्व्ह बँकेने गेतली आहे. त्यामुळेच बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. बँकेतील ९८ टक्के ठेवीदारांना त्यांची व्याजासह जास्तीत जास्त पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम परत मिळणार आहे. हे पैसे परत मिळवण्यासाठी ठेवीदारांना केवायसी (नो युवर कस्टमर) प्रक्रियेनुसार आवश्यक कागदपत्रांसह आपला दावा सादर करावा लागणार आहे. त्यानुसार हे पैसे प्राप्त होणार आहेत.