मुंबई – मोबाईल बील, इलेक्ट्रीक बील, ओटीटी सबस्क्रीप्शन यावरील ऑटो डेबीटचे सिस्टीम येत्या १ एप्रिलपासून बंद होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यासंदर्भात नवे नियम तयार केले असून ते १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. ग्राहकांच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. कारण आता ग्राहकांना विचारल्याशिवाय त्यांच्या बँकेतून पैसे कापून घेता येणार नाहीत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून बँकांना झटका देण्याचा निर्णय घेतला. ग्राहक हित डोळ्यापुढे ठेवून आरबीआयने हा नवा नियम आणल्याचे सांगितले जात आहे. अर्थात यामुळे युपीआयच्या ऑटोपे सिस्टीममधून अशा प्रकारच्या ऑटो–डेबीटवर कुठलाही परिणाम होणार नाही, हेही निश्चित आहे.
रिझर्व्ह बँकेने अॅडीशनल फॅक्टर ऑथेंटिकेशन (एएफए) साठी नवी मार्गदर्शकतत्वे लागू करण्यासाठी ३१ मार्चपर्यंतचा वेळ दिला होता. यात नव्या नियमामुळे सबस्क्रीप्शन वाढेल असेही सांगण्यात आले होते. आता नव्या नियमांनुसार बँकांना ऑटो–डेबिटच्या तारखेच्या पाच दिवस आधी ग्राहकांना नोटीफिकेशन पाठवावे लागेल. त्यावर ग्राहकाने मंजुरी दिल्यानंतरच खात्यातून पैसे काढणे बँकांना शक्य होणार आहे.
याशिवाय ५ हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम असेल तर ग्राहकांना ओटीपी पाठविणे बँकांना बंधनकारक करण्यात आले आहे. इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाचे म्हणणे आहे की, बहुतांश बँका या नव्या नियमांनुसार काम करण्यासाठी तयार नाहीत, त्यामुळे बँकांशी जुळलेले कार्ड नेटवर्क या अध्यादेशाचे पालन करू शकणार नाहीत.
मुख्य म्हणजे या नियमामुळे सर्वसामान्य ग्राहक तसेच तरुण वर्गाचाच फायदा होणार आहे. ऑटो डेबीटमुळे बरेचदा इच्छा नसतानाही सबस्क्रीप्शनचे पैसे कापून घेण्यात येतात.