इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालनाः माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी एका कार्यकर्त्याला चक्क लाथ मारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या कृत्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीकेची झोड उडली आहे.
एका माजी मंत्र्यांने आणि भाजपच्या माजी प्रदेशाध्यक्षाने अशा प्रकारे कार्यकर्त्याला लाथ मारणे अयोग्य असल्याचे म्हणत या घटनेवर नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. ऐन निवडणुकीच्या काळात हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे विरोधकांना दानवे यांची कोंडी करण्यासाठी आयते कोलीत मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यानंतर जालना विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांच्या प्रचारात भाजप सक्रिय नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर खोतकर यांनी भोकरदन येथे दानवे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे एक तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर आमचे मनोमिलन झाल्याचे खोतकर यांनी जाहीर केले.
या वेळी या दोघांनी एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सत्कार करताना प्रसारमाध्यमांचे सहकारी खोतकर आणि दानवे यांचे फोटो काढत होते. याच वेळी केवळ या दोन्ही नेत्यांचा फोटो काढायचा असल्याचे एक फोटोग्राफर म्हटल्यामुळे दानवे यांनी शेजारी उभ्या असलेल्या त्यांच्या एका कार्यकर्त्याला लाथ मारली.
लाथ मारल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ ‘सोशल मीडिया’वर व्हायरल होत आहे. दरम्यान लाथ मारलेला कार्यकर्ता हा दानवे यांचा जवळचा मित्र आहे. तरीही अशा प्रकारे वर्तन एका जेष्ठ नेत्याला शोभत नसल्याच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. यापूर्वीही दानवे आपल्या वक्तव्यामुळे आणि कृतीमुळे अनेकदा वादात सापडले आहेत.
ज्या कार्यकर्त्याला लाथ बसली त्याचे नाव शेख अहमद आहे. ते म्हणाले, की मी दानवे यांचा जवळचा मित्र आहे. आमची मैत्री तीस वर्षांपासूनची आहे. आज सकाळी व्हायरल झालेल्या बातमीत काहीही तथ्य नाही. लोक चिंधीचाही साप बनवतात. खोतकर दानवे यांना भेटायला आले होते. त्या वेळी दानवे यांचे शर्ट अडकले होते. ते काढण्यासाठी मी पुढे गेलो होतो. तेव्हा त्यांच्या हातामध्ये पुष्पगुच्छ असल्यामुळे त्यांनी तसे केले.
……….