इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी रवींद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मर्जीतले अशी ओळख रवींद्र चव्हाण यांची आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू, चंद्रशेखर बाबनकुळे यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते.
चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानतंर त्यांनी सांगितले की, २५ वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या भारतीयत्व जपणाऱ्या विशाल विचारधारेत सामील झालो. आपली विचारधारा विशाल गंगेप्रमाणे पवित्र आणि प्रवाही आहे. ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ हा विचार देणाऱ्या गंगेने मुख्य प्रवाहात मला सामावून घेतले. या विचारधारेने सामाजिक भान दिलं, आयुष्याच्या वळणावर मार्गक्रमण करण्याचं ध्येय दिलं, जगण्याची दिशा दिली. आपल्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याने जर विचारधारेचे रक्षण केले तर विचारधारा तुमचे रक्षण करेल, हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगू शकतो.
पक्षश्रेष्ठींचे मार्गदर्शन, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोलाची साथ तसेच लोकांचे शुभाशीर्वाद हेच माझे बलस्थान आहे आणि त्याचसोबत सर्वांचे प्रेम आणि विश्वास या शिदोरीच्या बळावरच प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा स्वीकारत आहे. यापुढील प्रवासातही तुम्हा सर्वांचा स्नेह, विश्वास आणि आपुलकी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. आज भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचू शकतो, ही संघटनेची ताकद आहे. अशी ताकद भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मिळो यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन ही ग्वाही देतो.
माझ्यावर विश्वास दाखवून प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा माझ्या हाती सोपवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह भाजपा परिवारातील सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार असे चव्हाण यांनी म्हटले आहे.