नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्ही जर रेशन धान्याचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचे वृत्त आहे. कारण, दसरा, दिवाळी सारख्या सणासुदीच्या काळात तुम्हाला रेशन धान्याचा लाभ मिळणार आहे. ते सुद्धा मोफत. यासंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाने मोफत धान्य वाटप योजनेला तीन महिन्याची मुदत वाढ दिली आहे. कोट्यवधी नागरिकांना याचा थेट लाभ होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सर्व लाभार्थींना दरमहा प्रति व्यक्ती ५ किलो मोफत धान्याचे वितरण डिसेंबर महिन्यापर्यंत केले जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२१ मध्ये लोकहितार्थ केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अतिरिक्त अन्न सुरक्षा बहाल करण्याच्या अनुषंगाने, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला, सातव्या टप्प्यांतर्गत ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान, आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यास केंद्रिय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
केंद्र शासनाने २०१३ मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा संमत केला होता. त्यानंतर देशातील विविध राज्यात त्याची अंमलबजावणी करण्यात आली. देशातील सुमारे ८१ कोटी जनतेला या कायद्यामुळे सवलतीच्या दरात अन्न धान्य मिळते. दरम्यान कोविड महामारीचे परिणाम आणि इतर विविध कारणांमुळे अवघे जग असुरक्षित परिस्थितीशी सामना करत असताना, भारतातील सर्वसामान्य नागरिकांना सहज आणि परवडण्याजोग्या पद्धतीने अन्न उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्र सरकारने देशातील असुरक्षित घटकांसाठी अन्न सुरक्षेची सुरुवात केली होती.
गरिबांच्या हितासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. यासोबतच गरीबांना मोफत किंवा कमी दरात रेशन देण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी याचा फायदा होत आहे. भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) गोदामांमध्ये अन्न सुरक्षा, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) आणि इतर कल्याणकारी योजनांच्या अंतर्गत धान्याची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ४.४ कोटी टन इतके अन्नधान्य राखीव आहे, असे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, इतर कल्याणकारी योजना आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना टप्पा सात अंतर्गत साठ्याची आवश्यकता पूर्ण केल्यानंतर सुध्दा १ एप्रिल २०२३ रोजी , महामंडळाकडे राखीव साठा नियमांपेक्षा अधिक साठा सहज उपलब्ध असेल. तसेच राखीव साठा सुमारे ७५ एलएमटी गहू आणि १३६ एलएमटी तांदूळ असे असून १ एप्रिल २०२३ रोजी, सर्व गरजा पूर्ण केल्यानंतर, केंद्रीय साठ्यामध्ये सुमारे ११३ एलएमटी गहू आणि २३६ एलएमटी तांदूळ उपलब्ध असतील,असा अंदाज आहे.
सध्या नागरिकांना सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत अंत्योदय, बीपीएल, केशरी, अन्नपूर्णा व शुभ्र अशा वेगवेगळ्या शिधापत्रिका अस्तित्वात आहेत. अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करताना विविध प्रकारच्या शिधापत्रिका रद्द करुन प्राधान्य (अंत्योदय) आणि अप्राधान्य म्हणजेच इतर अशाच दोनच शिधापत्रिकांमध्ये विभाजन करण्यात आलं आहे. या शिधापत्रिकांनुसार धान्याचे वितरण करण्यात येते, आता केंद्र सरकारद्वारे पुन्हा प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजची घोषणा करण्यात आली. यापूर्वी पॅकेजच्या अंतर्गत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून ८० कोटी राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियनाच्या लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप करण्यात आले. तसेच एकूण ११२१ लाख मेट्रिक टन धान्य वितरित करण्यात आले आहे.
Ration Shop Beneficiaries Important News Grains
Union Government