विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशभरात अनेक राजकीय, सामाजिक, धार्मिक किंवा नैसर्गिक समस्या निर्माण होतात आणि त्याबाबत कालांतराने उपाययोजना जातात. परंतु अशी एकच समस्या आहे, जी कायमच सर्वसामान्य माणसाला सतावत असते. ती म्हणजे महागाई होय. गेल्या अनेक वर्षांपासून महागाईची समस्या वाढतच असून काही केल्या त्यात कमी होताना दिसून येत नाही. सहाजिकच सर्वसामान्य माणसांना याबाबत नेहमीच चिंता वाटत असते. सध्या खाद्यतेल आणि डाळींचे दर वाढल्याने पुन्हा एकदा सामान्य माणसाच्या समस्या वाढवल्या आहेत.
गेल्या महिन्यांत खाद्यतेलांच्या किमती घसरल्यानंतर खाद्यतेलांच्या किमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत, तर डाळी देखील गेल्या एका महिन्यात महाग झाल्या आहेत. एका महिन्यात खाद्यतेलांच्या किमतीत २० टक्के आणि डाळींच्या किमतीत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशाची राजधानी दिल्लीच्या किरकोळ बाजारात डाळींचे भाव नवीन उच्चांकावर आहेत. इतकेच नव्हे तर मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, बंगळूरू, इंदूर, भोपाळ या सारख्या शहरांमध्ये देखील खाद्यतेल, डाळी आणि किराणा मालाचे भाव वाढलेले आहेत.
पूर्व दिल्लीतील व्यापा-यांच्या मते गेल्या एक महिन्यात राजमाचे भाव सर्वाधिक वाढले आहेत. राजमा प्रति किलो २० रुपयांपर्यंत वाढली आहे. तर इतर डाळींचे भाव ५ रुपयांनी वाढून १० रुपये झाले आहेत. खाद्यतेलाचे दर ५ ते २० रुपयांनी वाढले आहेत. डाळींच्या किमतींसह खाद्यतेलांच्या किमतीही दिल्लीच्या किरकोळ बाजारात ५ ते २० रुपयांनी वाढल्या आहेत. खाद्यतेलांच्या किंमती वाढण्याबाबत खाद्यतेलांचे घाऊक व्यापारी आणि भारतीय उद्योग मंडळाचे सरचिटणीस हेमंत गुप्ता म्हणतात की, आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलांच्या किमती गेल्या महिन्यात वाढल्या आहेत. यामुळे दिल्लीत खाद्यतेलांच्या घाऊक किमतीत १५ ते २० रुपयांची वाढ झाली आहे. दिल्ली ग्रेन मर्चंट असोसिएशनचे उपाध्यक्ष गौरव गुप्ता म्हणाले की, सरकारने गेल्या महिन्यात डाळींच्या किंमतीमध्ये वाढ केली होती. आतापर्यंत डाळींचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातच्या खाली चालत होते. गेल्या महिन्यात डाळींची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे.
गेल्या वर्षी लॉकडाऊन नंतर, या वर्षी बाजार ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत खूप वेगवान आहे. खाद्यपदार्थ आणि खाद्यतेलांच्या किमती चालू ऑगस्टमध्ये ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर ऑगस्टमध्ये सर्व प्रकारच्या डाळी आणि तेलाच्या किमती मागील जुलैच्या तुलनेत १० रुपये प्रति किलोने वाढल्या आहेत.जीवनावश्यक वस्तूंवरील महागाईमुळे सामान्य आणि मध्यम कुटुंबे त्रस्त झाली आहेत. त्यांना कुटुंब चालवणे अवघड झाले आहे. याबाबत बाजारातील दराच्या अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना महामारी रोखण्यासाठी गेल्या वर्षी खाद्यपदार्थांच्या किमती बाजारात लॉकडाऊननंतर घसरल्या होत्या. त्याच वेळी, साथीच्या दुसऱ्या टप्प्यात, किंमत खूप जास्त आहे. याचा बाजारावर परिणाम होत आहे.
गेल्या दोन महिन्यांत खाद्यपदार्थांच्या किमतीत कोणताही विशेष फरक पडलेला नाही. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात खाद्यपदार्थांच्या किंमतीत किंचित वाढ झाली आहे. दुसरीकडे, मागील वर्षाच्या तुलनेत, ३५ टक्क्यांची वाढ झाली आहे. यामुळे लोकांना खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतात. प्रत्येक कुटुंब जगण्यासाठी आवश्यक वस्तू खरेदी करते. अशा परिस्थितीत खाद्यपदार्थांच्या वस्तूंमध्ये किरकोळ वाढदेखील लोकांना जबरदस्त वाटते. सतत वाढणाऱ्या महागाईने लोकांच्या घराचे बजेट बिघडवले आहे. दर महिन्याला लोकांचे घरगुती बजेट वाढत आहे. त्याचा लोकांच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होत आहे. यामुळे, मध्यम आणि निम्न वर्गासाठी कुटुंबाच्या रेशनचा खर्च भागवणे कठीण होत आहे. कोरोना महामारीच्या प्रतिबंधासाठी लॉकडाऊन केल्यानंतर, बाजारात खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्या होत्या. त्यानंतर साथीच्या दुसऱ्या टप्प्यात, किंमत खूप जास्त आहे. याचा बाजारावर परिणाम होत आहे. लवकरच मालाचे भाव कमी करण्याकडेही केंद्र सरकारला लक्ष द्यावे लागेल.
दरम्यान, दैनंदिन वापरातील खाद्यपदार्थांच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याने गृहीणीचे किचनचे बजेट विस्कळीत झाले आहे. खाद्यतेलात वीस दिवसांत १० ते १५ रुपये प्रति लिटरने वाढ झाली आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ हेही महागाईचे एक कारण आहे. खाद्यतेल व्यापाऱ्यांच्या मते, लॉकडाऊननंतर खाद्यतेलांच्या किंमती वाढू लागल्या आहेत. सध्या शेंगदाणे, सोयाबीन आणि मोहरीच्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या २० दिवसात किंमत १० ते १५ रुपये प्रति लीटरने वाढली आहे. त्याचप्रमाणे डाळींचे भाव वाढले आहेत. सर्व डाळींचे भाव प्रति किलो २० ते २५ रुपयांनी महाग झाले आहेत. डाळ हरभरा ६२ ते ९०, मूग डाळ ७७ ते ८५, उडीद डाळ ९५ ते ११० रुपये प्रति किलो. तूप-तेलाचे व्यापारी चंद्रप्रकाश म्हणाले की, सध्याची परिस्थिती पाहता तेलांचे भाव आता याच पातळीवर राहतील. देशात सुमारे ७० टक्के खाद्यतेल आयात केले जाते, अशा परिस्थितीत परदेशातून आयात तेल स्वस्त होत नाही, तोपर्यंत खाद्यतेलाच्या किंमती खाली येणार नाहीत.