अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा हे त्यांच्या साधेपणामुळे आणि औदार्यामुळे अनेकदा चर्चेत असतात. देशावर जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा रतन टाटा मदतीसाठी पुढे येत असतात. त्यामुळे भारतीयांच्या मनात त्यांच्याविषयी अतिशय आदराचे स्थान आहे. त्यांच्यातील साधेपणा लोकांना प्रेमात पाडतो. रतन टाटांप्रमाणेच त्यांचे भाऊ जिमी टाटाही अगदी साधे आहेत. त्यांच्याकडे ना मोबाईल फोन आहे, ना आलिशान बंगला, हे ऐकून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
जिमी टाटा हे मुंबईतील कुलाबा येथे एका साध्या फ्लॅटमध्ये राहतात. त्यांच्याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी कधीही मोबाईल फोन घेतलेला नाही. घडामोडी जाणून घेण्यासाठी ते केवळ वृत्तपत्र वाचतात. तोच त्यांच्यासाठी माहिती मिळवण्याचा एकमेव स्त्रोत आहे. तरीही त्यांना टाटा समूहाच्या सर्व कारभाराची, येत असलेल्या बातम्यांविषयीची सखोल माहिती असते.
उद्योगपती हर्ष गोएंका यांनी नुकतेच जिमी टाटा यांच्याविषयी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी रतन टाटा यांचे भाऊ जिमी यांच्याबद्दल माहिती दिली आहे. तसेच त्यांनी जिमी टाटांचा फोटोही शेअर केला आहे. हर्ष गोएंका त्यात असे म्हणतात की, ‘रतन टाटा यांच्या धाकटे बंधू जिमी टाटा यांच्याबद्दल ते जाणून आहेत. ते मुंबईतील कुलाबा येथे दोन बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहतात. टाटा समूहाप्रमाणेच ते प्रसिद्धीपासून दूर राहतात. तसेच ते अविवाहित आहेत. हर्ष गोएंका यांच्या म्हणण्यानुसार, जिमी यांना व्यवसायात कधीच रस नव्हता. ते स्क्वॉशचे चांगले खेळाडू आहेत. प्रत्येक वेळी हर्ष गोएंका यांना ते या खेळात ते हरवतात.
https://twitter.com/hvgoenka/status/1483761998370598921?s=20
जिमी टाटा यांनी नव्वदच्या दशकात निवृत्त होण्यापूर्वी टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांमध्ये काम केले आहे. टाटा समूहातील ते भागधारक असून रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्त आहेत. मीडियापासून, प्रसिद्धीपासून ते दूर राहणेच पसंत करत असल्याने त्यांच्याविषयी लोकांना फारशी माहिती नाही. मात्र, टाटा कुटूंबियांविषयी जनतेत आपुलकीची भावना असल्याने त्यांच्या परिवाराविषयी जाणून घेण्याची उत्सुकता लोकांमध्ये दिसून येते.