मुंबई – आपल्या संस्कृतीत ‘भूतदया ‘ म्हणजेच प्राणीमात्रांवर देखील प्रेम करण्याचे पुर्वीच्या काळात साधुसंतांनी सांगून ठेवले आहे. आजच्या काळात देखील प्राणीमात्रांवर प्रेम करणारे काही लोक आपल्याला आजूबाजूला दिसतात. त्यांचे काम बघितल्यावर आपल्याला माणुसकी दिसून येते.
जगप्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांनाही आपल्या एका कर्मचाऱ्याच्या वर्तणुकीतून असेच माणुसकीचे दर्शन घडले आणि त्यांनी या कर्मचाऱ्यांचे भरभरून कौतुक केले. सध्या देशाच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे ग्रामीण तसेच शहरी माणसांच्या जीवनावर वाईट परिणाम होत आहे. मुसळधार पावसाचा सर्वात वाईट परिणाम शहरांमध्ये राहणाऱ्या प्राण्यांवर होतो. या मुसळधार पावसात मुंबईतील ताज हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याने रस्त्यावरील एका श्वानाला आपल्या छ्त्रीत आसरा दिला. त्याचे हे भूतदया तथा माणुसकीचे कृत्य पाहून टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी देखील कौतुक केले.
रतन टाटा यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या चित्रात, कर्मचारी एका कुत्र्याला त्याच्या छत्रीने ओले होण्यापासून वाचवताना दिसत आहे. ज्यामुळे रतन टाटा खूप प्रभावित झाले, त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, ‘मुसळधार पावसातही या ताज कर्मचाऱ्याने कुत्र्यासह आपली छत्री शेअर केली. मुंबईच्या गडबडीच्या आणि धावपळीच्या जीवनात हा हृदयस्पर्शी क्षण आहे. अशा प्रकारची वागणूक भटक्या प्राण्यांसाठी खूप काही चांगले सांगून जाते.’
ॉविशेष म्हणजे रतन टाटा यांची ही पोस्ट अनेक लोक सर्वत्र शेअर करत आहेत. तसेच ताज कर्मचाऱ्याची जोरदार स्तुती करत आहेत. एक व्यक्ती इतकी प्रभावित झाली की, त्याने रतन टाटा यांच्याकडे विनंती करत विशेष मागणी केली आणि लिहिले, ‘सर, अशा प्रकारच्या वर्तनासाठी, या ताज कर्मचाऱ्याचा पगार वाढला पाहिजे किंवा काहीतरी विशेष बक्षिस दिले पाहिजे.’