मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज (गुरुवार १० ऑक्टोबर) एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे.
रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
रतन टाटा यांचा लौकिक
टाटा उद्योग समूहाचे अध्यक्षपद भूषविलेल्या रतन टाटा यांचे भारतीय उद्योगांना जागतिक स्तरावर प्रस्थापित करण्यात महत्त्वाचे योगदान आहे. जग्वार, लॅण्ड रोव्हर, कोरस ग्रुप ऑफ स्टील कंपनी यासारख्या बड्या परकीय कंपन्यांची खरेदी करून टाटा उद्योग समूहाचे अधिराज्य निर्माण करण्यात रतन टाटा यांचा सिंहाचा वाटा आहे. स्टील, ऑटोमोबाईल्स, टी कंपनी, लक्झरी हॉटेल्स, एरोनॉटिकल अशा विविध उद्योग क्षेत्रात टाटा उद्योग समूहाचे नाव आहे. ‘टेटली’ ही टी बॅग्ज बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी म्हणून नावारुपास आली आहे. दानशूर उद्योगपती म्हणूनही रतन टाटा यांचा लौकिक आहे.