नाशिक – नाशिक महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांसंदर्भात महानगरपालिका अधिकारी व ठेकेदारांवर चौकशी करून काही निष्पन्न होणार नसून दत्तक नाशिकच्या हिताकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोबत रस्त्यावर उतरून आक्रमक व्हा ! असे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी आ.देवयानी फरांदे यांना लिहिले.नाशिक महानगरपालिका हद्दीतील बहुतांश रस्ते विविध कामांच्या नावाखाली खोदण्यात आले तसेच इतर ठिकाणच्या रस्त्यांवर पावसामुळे मोठे खड्डे पडले. या रस्त्यांवर खड्डे भरण्याचे काम महानगरपालिके मार्फत ठेकेदारांना देण्यात आले. सदरचे ठेकेदार खड्ड्यांमध्ये माती-मुरूम टाकून बुजवित असून पावसाच्या पाण्यामुळे माती व मुरूममुळे चिखल साचून अपघात घडत आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामांसंदर्भात आपण नाशिक महानगरपालिका आयुक्ताना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली. परंतु नाशिककरांनी कर स्वरुपात भरलेल्या पैश्यांची नासार्डी होऊन ठेकेदारांचे खिसे गरम होत असताना आपण तात्पुरत्या स्वरुपाची चौकशीची मागणी करत आहात. नाशिक महानगरपालिका अधिकारी व ठेकेदारांवर चौकशी करून काही निष्पन्न होणार नसल्याने दत्तक नाशिकच्या हिताकरिता आपण राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोबत रस्त्यावर उतरून नागरिकांसाठी लढा दयावा असे पत्रात नमूद केले आहे.