अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नांदगाव तालुक्यातील गिरणा धरणावरील ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेच्या सदोष यंत्रणेमुळे हिसवळ खुर्द, हिसवळ बु. ग्रामस्थांना पावसाळ्यात पिण्यासाठी पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा पाठपुरावा करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी नांदगाव मनमाड रोडवर रास्ता रोको आंदोलन केले. याचवेळी ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेतून सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी पोलिस आंदोलनस्थळी आले. त्यांनी ग्रामस्थांची मागणी समजून घेतली. यावेळी हिसवळ खुर्द चे सरपंच कैलास फुलमाळी, उपसरपंच संजय आहेर, सदस्य- नानासाहेब आहेर, सुदाम आहेर बंडूकाका आहेर, लखन आहेर, शांताराम लोखंडे, संदीप कदम, संदीप आहेर, माजी सरपंच विजय आहेर, माझे सरपंच मोहन दादा आहेर, माजी सरपंच संजय बापू आहेर,हिसवळ बु. सरपंच बाळू नाना बेंडके, रवींद्र देशमुख, श्रावण भालेराव, राजेंद्र करवर यासह, मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचीही गाडी ग्रामस्थांनी अडवली व आपले संपूर्ण गाऱ्हाणे त्यांच्यासमोर मांडले यातून लवकरात लवकर योग्य तो मार्ग काढण्याचेही लीना बनसोड यांनी ग्रामस्थांना सांगितले.