नाशिक – उंटवाडीतील कालिका पार्क भागातील रस्त्यावरील खड्डे आज खडी टाकून बुजविण्यात आले. शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनच्या पाठपुराव्याला यश आले आहे. काही महिन्यांपूर्वी कालिका पार्क ते स्काय कोर्ट इमारतीपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण झाले. त्यानंतर काही दिवसातच कालिका पार्क आणि रुंग्ठा इम्पेरिया इमारतीपर्यंतच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले. काही दिवसांपूर्वी मुरूम टाकून तात्पुरती दुरूस्ती करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा रस्ते उखडले. खड्ड्यांमुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता. रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावे, अशी मागणी २२ जुलै २०२१ रोजी सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारूशिला गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, श्याम अमृतकर, दिलीप दिवाने, मकरंद पुरेकर, विनोद पोळ, मनोज वाणी, मगन तलवार, विजय कांडेकर, राहुल काळे, घनश्याम सोनवणे आदींनी निवेदनाद्वारे केली होती. त्यानंतर महापालिका बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मंगळवारी, २१ सप्टेंबर रोजी खडी टाकून खड्डे बुजविण्यात आले. पावसाळ्यानंतर या रस्त्यासह या भागातील इतर अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करावे, अशी मागणी शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनने केली आहे.