नाशिक– के.के.वाघ महाविद्यालय ते जत्रा हॉटेल उड्डाणपूल तातडीने सुरु करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अंबादास खैरे व त्यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रीय महामार्ग ३ चे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक बी. साळुंखे यांना दिले. के.के.वाघ महाविद्यालय ते जत्रा हॉटेल दरम्यानच्या उड्डाणपूलाच्या कामास सन २०१७ पासून सुरुवात करण्यात आली. सद्यस्थितीत सदर उड्डाणपूलाचे जवळपास संपूर्ण काम झालेले असल्याचे दिसून येत असले तरी देखील तो सर्वसामान्यांच्या उपयोगाकरिता खुला करण्यात आलेला नाही. उड्डाणपुलाखालील वापरात असलेला रस्ता अरुंद असल्याने अवजड वाहनांची वाहतूक याच अरुंद रस्त्याने होत आहे. त्यामुळे उड्डाणपुलाखालील द्वारका ते जत्रा हॉटेल रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होऊन अपघात घडत आहे. द्वारका, औरंगाबाद नाका, के.के.वाघ महाविद्यालय, बळी मंदिर, जत्रा हॉटेल या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागत असून वाहनधारकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने के.के.वाघ महाविद्यालय ते जत्रा हॉटेल उड्डाणपूल तातडीने सुरु करण्यात यावा अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सदरचा उड्डाणपूल सर्वसामान्यांकरिता खुला करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी मुकेश शेवाळे, विशाल डोखे, राहुल कमानकर, संतोष भुजबळ, अक्षय पाटील, सचिन जगताप, बाळासाहेब जमदाडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.