नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – छगनराव भुजबळ यांनी मंत्री पदाची शपथ घेताच त्यांना नाशिकचे पालकमंत्री करावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बॅनर द्वारे केली आहे.
छगनरावजी भुजबळ हे राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते असून त्यांनी सर्वाधिक वेळा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषविल्याने त्यांचा अनुभव देखील दांडगा आहे. २०२७ मध्ये नाशिक मध्ये कुंभमेळा होत असून यामुळे जागतिक पातळीवर नाशिकचे नाव चर्चिले जाणार आहे. भुजबळ हे पालकमंत्री असताना कुंभमेळा झाला होता यात त्यांनी केलेले यशस्वी नियोजन व विकासकामे आज ही आठवणीत आहे. मागील कुंभमेल्यात पालकमंत्री नसताना देखील त्यांनी अनेक कामे केल्याचे निदर्शनास येते. कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर योग्य नियोजना संदर्भात भुजबळानी विभागिय आयुक्तांना वेगवेगळ्या विषयांवर पत्राद्वारे मार्गदर्शन सुचना केल्या आहे.
तसेच नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी सर्वाधिक सात जागांवर राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी अजित पवार गटाने विजय मिळवला असून सर्वाधिक आमदारांचा जिल्हा बनला आहे. त्यामुळे दूरदृष्टि ठेऊन नाशिक जिल्ह्याचा योग्य विकास व कुंभमेल्याचे यशस्वी नियोजनाकरिता छगनराव भुजबळ यांनाच पालकमंत्री पद मिळावे अशी सर्व नाशिककरांची प्रामाणिक इच्छा आहे. यासाठी अंबादास खैरे यांनी महादेवाच्या पिंडीला दुग्धाभिषेक करत साकडे देखील घातले होते. तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.