नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सतत वाढणाऱ्या पेट्रोल – डीझेलच्या किमतीला पर्याय म्हणून वाहनधारक नैसर्गिक वायू कडे वळलेले असताना नैसर्गिक वायूच्या किमतीही झपाट्याने वाढत असल्याने त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सीएनजी पंपावरील ग्राहकांना काळी आपट्याची पाने वाटप उपहासात्मक आंदोलन केले.
दसऱ्याच्या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते. त्याचे प्रतिक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने वाटण्याची प्रथा आहे. महागाईमुळे नागरिकांचे सर्वच सणावर पाणी फिरलेले असताना मोदी सरकार नवनवीन माध्यमातून जनतेला महागाईच्या खाईमध्ये ढकलत आहे. पेट्रोल-डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किमतीला पर्याय म्हणून सरकारने नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या वाहनांचा पर्याय दिला व त्यानुसार वाहनधारक त्याकडे वळाले सुद्धा परंतु सद्यस्थितीत डीझेलच्या किमतीपेक्षा सीएनजीची किमती जास्त असल्याने वाहनधारक आपल्या कपाळावर हात मारून घेत आहे.
महागाई गेल्या काही वर्षांतील सर्वोच्च स्थराला पोहोचली आहे. सर्व वस्तूंचे दर गगनाला भिडलेले असताना यामध्ये भर पडलीयं ती म्हणजे सीएनजी गॅसची. नाशिक शहरात सीएनएजीच्या दरात प्रति किलोमागे चार रुपयांची मोठी वाढ करण्यात आलीयं. यामुळेच आता सीएनजी ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सीएनजी गॅस दरात मोदी सरकारकडून सततची दर वाढ करण्यात येत आहे. सीएनजी गॅस दर वाढत असल्याने वाहन चालकांना मोठा फटका याचा सहन करावा लागतोयं. ९२ रुपये वरून नाशिकमध्ये आता सीएनजी गॅस ९६ रुपयांवर पोहचला असल्याने वाहनधारक संतप्त झाल्याचे चित्र बघायला मिळते आहे. यावेळी बाळा निगळ, जय कोतवाल, विशाल डोके, निलेश भंदुरे, सागर बेदरकर, राहुल कमानकर, अमोल नाईक, डॉ.संदीप चव्हाण, निलेश सानप, संतोष भुजबळ, हर्षल चव्हाण, सुनिल घुगे आदींसह मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.