इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालनाः जालना जिल्ह्यातील भोकरदन विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आता मुद्द्यावरून गुद्द्यावर आली आहे. दोन्ही दानवेंमध्ये चांगलीच अटीतटीची लढत येथे होत असून काल रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान दगडवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार चंद्रकांत दानवे हे गावातील प्रचार सभा आटोपून आपल्या सोबतच्या स्थानिक कार्यकर्त्यांसोबत गाड्यांचा ताफा घेऊन निघाले असता दगडवाडी भोकरदन रस्त्यावर शाळेच्या समोर अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेक केली.
दानवे यांची गाडी पुढे निघून गेली होती; मात्र त्यांच्या पाठीमागील असलेल्या गाडीत त्यांचे कार्यकर्ते तसेच भोकरदनचे माजी आमदार संतोष दसपुते यांचे पुत्र राजेंद्र दशपुते हे होते. त्या दगडफेकीमध्ये एक दगड राजेंद्र दसपुते यांच्या खांद्याला लागून ते जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच लगेच सर्वांनी रात्रीच भोकरदन येथे पोलिस ठाण्यात येऊन आमदार चंद्रकांत दानवे यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. भोकरदनचे पोलिस या घटनेचा व दगडफेक करणाऱ्या कार्यकर्त्याचा शोध घेत आहेत.
भोकरदन विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पारंपारिक प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार संतोष दानवे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांच्यात तिसऱ्यांदा लढत होत आहे. ही निवडणूक अटीतटीची होत असून दोन्ही दानवे जोरदार प्रचार अभियान राबवत आहे. त्यातच दगडवाडी येथील दगडफेकीच्या घटनेमुळे या निवडणुकीला गालबोट लागलेले आहे. शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक आता मुद्द्यावरून गुद्यावर आलेली दिसत आहे.