नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शिवसेना,काँग्रेस,भाजपा मध्ये असलेले आणि सन २०१९ मध्ये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ साहेब यांनी पवार साहेबांची मध्यस्थी करून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून घेतलेल्या माणिकराव कोकाटे यांनी भुजबळ साहेबांना सल्ले देतांना आपल्या निष्ठेबाबत सिंहावलोकन करावे,भुजबळ साहेबांबद्दल बोलताना आपला इतिहास पहावा, यापुढे भुजबळ साहेबांबद्दल गैरवक्तव्य सहन केले जाणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांनी दिला आहे.
गोरख बोडके यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, माणिकराव कोकाटे हे शिवसेना, काँग्रेस, भाजपा या सर्व पक्षात फिरून आले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत तर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ साहेबांना टोकाचा विरोध केल्यानंतर देखील भुजबळ साहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये घेतले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत पवार साहेब कोकाटेंना घेण्यासाठी इच्छुक नव्हते मात्र भुजबळ साहेबांनी त्यांची समजूत काढून कोकाटेंचा प्रवेश करून घेतले. नुसते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये घेतलेच नाही तर सन २०१९ च्या निवडणुकीत त्यांना सिन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडून आणण्यासाठी माजी खासदार समीर भुजबळ यांनी सिन्नर मधील गावागावात फिरून त्यांचा प्रचार केला.भुजबळ साहेबांनी प्रचार सभा घेऊन त्यांना निवडून आणले. ज्या भुजबळ कुटुंबावर टीका करताय त्यांनीच तुम्हाला अनेकवेळा तारलेय हे विसरू नका.
आज माणिकराव कोकाटे अजितदादा पवार यांच्यावर छाप पडण्यासाठी भुजबळ साहेबांना विरोध करताय. तसेच एकनिष्ठ असल्याच्या गप्पा मारताय. त्यांनी भुजबळ साहेबांसारख्या ओबीसींच्या ज्येष्ठ नेत्याला सल्ले देण्याचे तसेच शिकविण्याचे काम करू नये. तशी त्यांची कुवतही नाही अशी टीका गोरख बोडके यांनी केली आहे.
ज्या निष्टेतेच्या आणि प्रामाणिकपणाच्या गप्पा कोकाटे मारताय त्या ऐकून करमणूक मात्र नक्कीच होते आहे.सुरुवातीला त्यांची निष्ठा तत्कालिन मुख्यमंत्री श्री नारायण राणे साहेब यांच्यावर होती,कारण ते मुख्यमंत्री होते नंतर मंत्रिमंडळात महसूल मंत्री होते त्यांच्यासाठी तुम्ही शंभर आमदारक्या ओवाळायला तयार होते पण जेव्हा आदरणीय राणे साहेब पायउतार होऊन पृथ्वीराज चव्हाण आले तेव्हा लगेच त्यांना राणे साहेबांचा विसर पडला, अशी असे अनेक उदाहरणे देता येईल.कारण पाच वर्षापूर्वी पक्षात आलेल्या कोकाटेंची निष्ठा फक्त पाच वर्षाची आहे. अर्थात जो नेता सत्तेत तोच आपला नेता ही त्यांची तुमची भूमिका सर्वाना माहित आहे. म्हणून अजितदादा पवार यांच्या विषयी आलेले प्रेमाचे भरते हे म्हणजे पुतना मावशीचे प्रेम आहे,हे सर्व जनता जाणून आहे, त्यामुळे तुम्ही आदरणीय भुजबळ साहेब यांच्या विषयी गरळ ओकताना किमान निष्ठा आणि प्रामाणिकपणा याविषयी तरी बोलू नये अशी टीका देखील गोरख बोडके यांनी केली आहे.
१५ वर्षे भुजबळ साहेब मंत्री असताना आम्ही त्यांच्या पदाबाबत कधी बोललो नाही असं म्हणणाऱ्या कोकाटेंना हे बोलण्याचा अधिकार सुद्धा नाही.कारण ते भुजबळ साहेबांच्या पक्षात कधी आले ते आधी त्यांनी पाहावं.२०१९ ला कोकाटे यांना पक्षात घेताना भुजबळ साहेबांनी पुतण्या आणि मुलाचा विचार केला नाही. आज कोकाटे यांना जात पात आठवत आहे. त्यावेळी त्यांनी कोकाटे यांची जातपात सुद्धा पाहिली नाही. १९९१ पासून भुजबळ साहेब हे मंत्री आहेत.मात्र ते दुसऱ्या मतदारसंघात जाऊन त्यांनी तिथल्या आमदारांना खिजवण्याचे काम केले नाही.मात्र आज माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्थापक प्रदेशाध्यक्ष असलेल्या भुजबळ साहेबांच्या मतदारसंघात पोस्टर बॅनर लावून मंत्री झाल्याचा आनंद घेत आहे. मात्र मंत्री असल्याचा त्यांचा हा गर्व फार काळ टिकणार नाही. कारण मंत्री पद काय कुणी आजन्म घेऊन आलेले नसतं, याचही भान कोकाटेंनी ठेवावं.
गोरख बोडके यांनी पुढे म्हटले आहे की, वास्तविक दिलीप बनकर आणि नितीन पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापनेपासून पक्षात आहेत.यांच्यासारखे सीनियर आमदार पक्षात असताना देखील सीनियर आणि एकनिष्ठ राहिलेल्या आमदारांना डावलून कोकाटेना मंत्रीपद का देण्यात आले हा देखील मोठा प्रश्नच आहे. कोकाटेंना मंत्री पद देतांना नेमकी कुठला प्रामाणिकपणा, सीनियरिटी आणि एकनिष्ठता बघितली गेली असा सवाल गोरख बोडके यांनी उपस्थित केला आहे.