मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार असून त्यासाठी २५ स्टार प्रचारकांची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली.
या यादीत उपमुख्यमंत्री व राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, एस. आर. कोहली, ब्रिजमोहन श्रीवास्तव व जम्मू आणि काश्मीर प्रदेशाध्यक्ष डॅा. तारिक रसूल यांच्यासह पार्थ पवार यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादीचे या अगोदर काही राज्यात आमदार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने आपल्या राजकीय कक्षांचा विस्तार करण्यासाठी या निवडणुकीत रणनिती आखली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी कोणाबरोबर आघाडी करेल की स्वतंत्र निवडणूक लढवेल हे मात्र स्पष्ट नाही.