लखनऊ – उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. त्यादृष्टीने राजकीय खडाजंगी सुरू होण्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपले काम सुरू केले आहे. अलीकडेच झालेल्या समन्वय बैठकीत संघाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील सरकारच्या कामावार समाधान व्यक्त केले. पण धर्मांतरण, लव्ह जिहाद आणि लोकसंख्या नियंत्रण या तीन मुद्द्यांवर जोर देण्याचा सल्ला योगींना देण्यात आला आहे.
राज्य सरकार, भाजप आणि संघाशी संलग्नीत संघटनांसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने समन्वय बैठक घेतली. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे आणि सहसरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि डॉ. दिनेश शर्मा यांचीही उपस्थिती होती. मंत्र्यांनी सरकारच्या कामांचा गोषवारा संघापुढे मांडला. कोरोना काळातील कार्य, जनकल्याणकारी योजना आदींची माहिती संघाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली.
भाजपा प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी विविध उपक्रमांची महिती दिली. त्यानंतर संघाने सरकारच्या व संघटनेच्या कामावर समाधान व्यक्त केले. अंत्योदयच्या सिद्धांतावर सेवाकार्य कौतुकास्पद असल्याचे मत संघाने नोंदवले. ‘राजकारण असेच सेवेच्या आधारावर व्हायला हवे. हीच कार्यपद्धती पुढेही ठेवा,‘ असे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सरकार व संघटनेला म्हटले. समाजाच्या हितासाठी भाजपचे पुन्हा एकदा सत्तेत येणे आवश्यक आहे, यावर जोर देण्यात आला.
राष्ट्रवादाचा अजेंडा
युपी मिशन-२०२२ साठी राष्ट्रवादाचा अजेंडा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे लव्ह जिहाद आणि धर्मांतरणाच्या मुद्यावर योगींनी केलेल्या कार्याचे संघाने विशेष कौतुक केले. यातून समाजात चांगला संदेश जाईल, असे संघाचे म्हणणे आहे.