इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर भारतीय तिरंग्याचा फोटो न लावल्यामुळे सध्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. खरं तर, पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’ कार्यक्रमात ‘आझादी का अमृत महोत्सव’ एका जनआंदोलनात बदलत असल्याचे सांगितले होते. तसेच, येत्या 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान लोकांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर तिरंग्याचा फोटो ठेवावा, अशी विनंती केली होती.
तेव्हापासून अनेकांनी त्यांची प्रोफाईल डीपी बदलली आहे. मात्र, याबाबत सोशल मीडियावर अनेक जण संघावर टीका करत आहेत. आता संघाने या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेडकर म्हणाले की, “अशा गोष्टींचे राजकारण करू नये. संघाने ‘हर घर तिरंगा’ आणि ‘आझादी का अमृत महोत्सव’ यांसारख्या कार्यक्रमांना यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. जुलैमध्ये, संघाने सरकारी, खाजगी संस्था आणि संघाशी संलग्न संस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये नागरिक, स्वयंसेवकांचा पूर्ण पाठिंबा आणि सहभाग घेण्याचे आवाहन केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतरही संघाच्या वेबसाइटवर आणि सोशल मीडिया अकाउंटवर तिरंग्याचे चित्र न टाकल्याबद्दल आंबेडकरांना सोशल मीडियावरील टीकेबद्दल विचारण्यात आले, त्यावर त्यांनी उत्तर दिले. अशा बाबी आणि कार्यक्रमांना राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे, असे ते म्हणाले. अशा प्रकरणांमध्ये राजकारण करू नये. असे प्रश्न उपस्थित करणारा पक्ष देशाच्या फाळणीला जबाबदार असल्याचा आरोप कोणाचेही नाव न घेता आंबेडकर यांनी केला आहे.
सोशल मीडियावर उपस्थित होत असलेल्या प्रश्नांबाबत त्यांना विचारले असता त्यांनी सरळ उत्तर दिले नाही आणि ते म्हणाले, ही एक प्रक्रिया आहे. आपण ते पाहू. तो कसा साजरा करायचा याचा विचार करत आहोत. संघाने यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली असून अमृत महोत्सवासंदर्भात केंद्राने सुरू केलेल्या सर्व कार्यक्रमांना पाठिंबा दिला आहे.
Rashtriya Swayamsevak Sangha RSS Social Media Profile Indian Flag Photo RSS