चित्रकूट (उत्तर प्रदेश) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कितीही टिका झाली तरीही त्याला लगेच उत्तर दिले जात नाही. संघाच्या बैठकांमधून, कार्यक्रमांमधून वेळ येईल तेव्हाच सरसंघचालक त्यावर भाष्य करतात. पण तातडीने प्रतिक्रिया देण्याचा काळ लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता सतर्क झाला आहे. त्यामुळे येत्या काळात संघाचे स्वयंसेवक इंटरनेटवर पूर्णवेळ सक्रीय दिसले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नसेल.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या स्वयंसेवकांना तश्या सूचनाच दिल्या आहेत. संघातील मोठ्या पदांवर असलेले पदाधिकारी तर इंटरनेट मिडीयावर आहेत. मात्र आता शाखास्तरावर स्वयंसेवकांनाही सक्रीय राहण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या धरतीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही उच्च तंत्रज्ञान डिजीटल माहिती संवाद केंद्र (आयटीसेल) स्थापन होणार आहे.
राष्ट्रीय स्तरावरील खेड्यांपर्यंत शाखांच्या माध्यमातून संघ आपल्या विचारांचा प्रचार प्रसार करतो. अखिल भारतीय कार्यकारीणी अधिकारी आणि सदस्यांमध्ये काही लोक इंटरनेट मिडीयावर आहेत. संघाच्या विचारांवर चालणाऱ्या ५० पेक्षा अधिक संघटना विविध वर्गांच्या लोकांपर्यंत आपला राष्ट्रवादी विचार पोहोचवत आहेत. मात्र आता पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इंटरनेट मिडीयाच्या माध्यमातून आपल्या विचारांचा प्रचार-प्रसार करणार आहे.
तर्कांसह आपले म्हणणे समाजात मांडून भ्रम दूर करण्याचा उद्देश असणार आहे. त्यासाठी स्वयंसेवकांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल. सोबतच अद्ययावत डिजीटल माहिती केंद्र स्थापन होईल. यातून इंटरनेटवर संघाच्या विरोधात किंवा हिंदूंच्या विरोधात पसरविल्या जाणाऱ्या माहितीला उत्तर देण्याचे काम होईल, असे सांगितले जाते. त्यासाठी डिजीटल व्हॉलिंटिअर्स नेमण्याची तयारी संघाने केली आहे.