चित्रकुट (उत्तर प्रदेश) – हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आजपर्यंत अप्रत्यक्षपणे मुस्लीमांविरुद्ध धोरण अवलंबले. मात्र आता राष्ट्रवादी विचारधारेशी मुस्लीमांना जोडण्याचा प्रयत्न संघ करणार आहे, असे संकेत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अलीकडेच केलेल्या विधानातून मिळतात.
उत्तर प्रदेश येथील चित्रकुटमध्ये अखिल भारतीय प्रांत प्रचारकांची मुख्य बैठक सुरू आहे. या बैठकीच्या पूर्वी सदस्यांसोबत झालेल्या चर्चेतूनही असेच संकेत मिळत आहे. गुरुवारी झालेल्या कोअर ग्रुपच्या बैठकीत योगी सरकारचे कामकाज आणि त्याचा जनमानसावरील प्रभाव यावरही चर्चा झाली. प्रांत प्रचारकांच्या बैठकीत सामील होण्यापूर्वी मोहन भागवत गाझियाबादमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्याठिकाणी त्यांनी पूजन विधीच्या आधारावर हिंदू आणि मुस्लीमांना वेगळे करता येणार नाही, असे विधान केले.
सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे. भाषा, प्रांत आणि इतर विषमतांना सोडून एकत्र यावे लागेल तरच भारत विश्वगुरू होईल, असे सरसंघचालक म्हणाले. प्रचारकांची बैठक सुरू होण्यापूर्वीच सरसंघचालकांनी अजेंडा स्पष्ट केला आहे. त्यातल्या त्यात मुस्लीम विरोध नव्हे तर मुस्लीमांना जवळ करण्याचा अजेंडा असल्यामुळे त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा होत आहे.
हिंदुत्वाशी नाते तरीही
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हिंदुत्व हा एकमेव अजेंडा असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे मुस्लीम बांधव त्यांच्याशी जुळवून घेणार नाहीत, हे त्यांना माहिती आहे. अशात राष्ट्रवादी विचारधारेच्या तत्वावर मुस्लीमांना जोडण्याचा संघ प्रयत्न करणार आहे.
पाच राज्यांच्या निवडणुका
पुढील वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब व इतर राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. शिवाय वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्येही निवडणूक आहे. त्यामुळे त्यादृष्टीनेही चर्चा झाली. प्रांत प्रचारकांच्या बैठकीनंतर भाजपला निवडणुकीच्या दृष्टीने सल्ला दिला जाऊ शकते.