अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने शनिवार, १२ मार्च रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये येथील एका मोटार अपघात प्रकरणातील निकाल देण्यात आला. अपघातात मृत्युमुखी पावलेल्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली.
या प्रकरणात पक्षकार श्रीमती सुनीता उत्तम फुलमाळी यांचे पती पेट्रोल पंपावर कार्यरत होते. ते कामावर जात असताना कंटेनर सोबत झालेल्या अपघातात त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील असा आप्त परिवार आहे. त्यांनी नुकसान भरपाई मिळणेसाठी जिल्हा न्यायालय अहमदनगर येथे प्रकरण दाखल केले होते. सदर प्रकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या राष्ट्रीय लोक अदालतीच्या पॅनलवर ठेवण्यात आले होते. पॅनल प्रमुख, सदस्य, पक्षकार यांचे विधिज्ञ व नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे विधिज्ञ यांच्या प्रयत्नामुळे पक्षकार श्रीमती सुनीता उत्तम फुलमाळी यांना २८ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. न्याय मिळाल्याने लाभार्थी व त्यांच्या परिवाराने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर यांचे आभार मानले.
राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून यशस्वीरित्या थाटला संसार
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने आयोजित कौटुंबिक लोक अदालतीमध्ये कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित असलेले प्रकरण यशस्वीरित्या मिटविण्यात आले. दोघेही पती-पत्नी नोकरदार असल्यामुळे ते एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांच्यात एकमेकांबद्दल अनेक गैरसमज निर्माण झाले होते. त्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण होऊन तो विकोपास गेला होता. सदरील प्रकरण जिल्हा न्यायालयातील पॅनेलवर ठेवण्यात आले होते. पॅनल प्रमुख, पॅनल सदस्य यांच्या प्रयत्नातून दोघांमधील वाद सामोपचाराने मिटविण्यात आला. सदर प्रकरण मिटल्यामुळे, आमच्या दोघांमधील वाद यामुळे आम्ही दोघे तसेच आमच्या कुटुंबातील सदस्य हे मानसिक तणावाखाली होतो, ‘साधता संवाद, मिटतील वाद’ या विधी सेवा प्राधिकरणाच्या उक्तीप्रमाणे आमच्यामधील वाट मिटवण्यासाठी आम्ही संवाद साधला व आमच्यामधील वाद संपुष्टात आला. याचे सर्व श्रेय आम्ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने आयोजित केलेल्या लोक अदालतीला देतो अशी भावना व्यक्त केली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथील लोक अदालतीमध्ये आमच्या दोघांमधील वाद मिटल्यामुळे म्हटल्यामुळे आज रोजी आम्ही दोघेही तसेच आमच्या कुटुंबातील सदस्यांना खूप आनंद झाला आहे, पदाधिकारी यांचे आभारी आहोत. अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
000