इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (26 डिसेंबर 2024) राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित समारंभात 7 श्रेणीत 17 मुलांना त्यांच्या असामान्य कामगिरीबद्दल प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले.
यावेळी बोलताना राष्ट्रपतींनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले तसेच संपूर्ण देशाला आणि समाजाला त्यांचा अभिमान असल्याचे त्या म्हणाल्या. याप्रसंगी मुलांशी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की त्यांनी असामान्य कार्य केले आहे, आश्चर्यकारक कामगिरी केली आहे, त्यांच्यात अमर्याद क्षमता आहेत आणि अतुलनीय गुण आहेत. तसेच, या मुलांनी देशातील इतर मुलांसमोर आदर्श ठेवला आहे, असे ही त्या म्हणाल्या.
मुलांना संधी उपलब्ध करून देणे आणि मुलांच्या कलागुणांना वाव देणे, हा आपल्या परंपरेचा एक भाग आहे, असेही त्या म्हणाल्या. ही परंपरा आणखी दृढ व्हायला हवी यावर त्यांनी भर दिला. 2047 मध्ये जेव्हा आपण भारताच्या स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करू तेव्हा हे पुरस्कार विजेते देशाचे सुबुद्ध नागरिक असतील. अशी हुशार मुले-मुली विकसित भारताचे निर्माते बनतील, असे त्यांनी सांगितले.