नवी दिल्ली – कोविड-19 ची लस घेणाऱ्या महिलांचे प्रमाण कमी असल्याने राष्ट्रीय महिला आयोगाने सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. लसीकरणातली महिला आणि पुरुष यांच्या प्रमाणातली ही तफावत दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आणि लसीकरण अभियानात महिला मागे राहू नयेत याची खातरजमा करण्याची विनंती त्यांनी या पत्रात केली आहे.लसीकरणात महिला आणि पुरुष यांच्या प्रमाणातली असमानता ही अतिशय चिंतेची बाब असून लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी येणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढवण्याची तातडीची गरज असल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी पत्रात म्हटले आहे.
अधिकाधिक महिलांचे प्राधान्याने लसीकरण व्हावे यासाठी जन जागृती करण्याची आवश्यकताही पत्रात नमूद करण्यात आली आहे. सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांनाही या पत्राची प्रत पाठवण्यात आली आहे. लसीकरणामध्ये महिला आणि पुरुष यांच्या प्रमाणातली ही तफावत युवतीपेक्षा वयोवृद्ध महिलांमध्ये जास्त आहे. याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. अनेक कुटुंबात, नोकरदार नसलेल्या महिलांच्या आरोग्याला पुरुषांच्या तुलनेत, प्राधान्य दिले जात नसल्याने लसीकरणासाठी त्यांना कमी प्राधान्य दिले जाते. मात्र कुटुंबातल्या आजारी सदस्याची काळजी घेण्यात महिला आघाडीवर असतात म्हणूनच त्यांना संसर्गाची जास्त शक्यता असते असेही पत्रात म्हटले आहे. लसीबाबतचा अपप्रचार आणि अफवा दूर करण्यासाठीच्या नियमित अभियानाबरोबरच देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात लसीकरण अभियानाला केंद्र सरकार गती देत आहे, असे त्यांनी पत्रात लिहिले आहे.