नवी दिल्ली – राष्ट्रीय महिला आयोगाने (एनसीडब्ल्यू) आज घरगुती हिंसाचारापासून बचावलेल्या महिलांना मदत पुरवण्याच्या दृष्टीने सुरक्षा अधिका-यांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकादमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन (एलबीएसएनए) च्या सहकार्याने ‘घरगुती हिंसाचार हाताळण्यासाठी सुरक्षा अधिकाऱ्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम’ ही प्रकल्प मालिका सुरु केली. उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती झुबिन इराणी व्हर्च्युअली उपस्थित होत्या.
स्मृती इराणी यांनी आपल्या उद्घाटन भाषणात राष्ट्रीय महिला आयोगाने हाती घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, सुरक्षा अधिकारी प्रशासन आणि पीडित महिलांसाठी न्याय यांच्यातील अंतर कमी करतात आणि पीडितांना उपलब्ध असलेल्या सर्व कायदेशीर हक्क सहज उपलब्ध करून देणे हे त्यांचे प्राधान्य असले पाहिजे. विशेषत: महामारीच्या काळात अडचणीत सापडलेल्या महिलांना मदत करण्यासाठी रात्रंदिवस काम केल्याबद्दल त्यांनी एनसीडब्ल्यू नेतृत्वाचे अभिनंदन केले. आयोगाने सुरू केलेले विविध कार्यक्रम, उदा. गर्भवती महिलांसाठी हेल्पलाईन आणि सुरक्षा अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्या सध्याच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.