नाशिक – नाशिक मधील प्रशस्त सिटी सेंटर मॉल येथील पार्किंगच्या शुल्क व व्यवस्थापनाच्या मनमानी कारभार विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सिटी सेंटर मॉल व्यवस्थापक अभय चांदेकर यांना निवेदन दिले. यावेळी मॉल व्यवस्थापकाने निवेदन स्वीकारण्यास विलंब केल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उभ्या असलेल्या वाहनांना निशुल्क पार्किंग सेवा दिली. त्याकारणाने मॉल व्यवस्थापन व शिष्टमंडळामध्ये शाब्दिक चकमक झाल्याने पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.
नाशिक शहरात सिटी सेंटर मॉल प्रशस्त असल्याने नाशिककर मोठ्या प्रमाणात सिटी सेंटर मॉलमध्ये खरेदी करण्यास जातात. सिटी सेंटर मॉल मध्ये विविध सेवा-सुविधा एकाच छताखाली असल्याने ग्राहकांची येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मॉल बहुमजली असल्यामुळे येथे पार्किंगला मोठ्या प्रमाणात जागा देखील उपलब्ध असून आलेल्या ग्राहकांकरिता स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सेवा-सुविधांचा लाभ घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांना मॉल मधील वाहनतळावर शुल्क भरावे लागते. परंतु इतर सुविधांच्या तुलनेत वाहनतळावरील शुल्क भरमसाठ असल्याने ग्राहक आपली वाहने रस्त्यांवरच उभी करतात. मॉल बाहेरील दुतर्फा रस्त्यालगत वाहनाच्या रांगा लागल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणे नित्याचे बनले आहे. याकरिता मॉल व्यवस्थापनाने पार्किंग शुल्क कमी केल्यास ग्राहक आपले वाहन रस्त्यावर उभे न करता मॉलच्या अधिकृत वाहनतळावर उभे करतील.
मॉलच्या पार्किंगमधून वाहन बाहेर गेल्यावर त्याची वैधता तातडीने संपुष्टात आल्याचे कारण देत व्यवस्थापनाचे ग्राहकांसोबत भांडण होत असते. टोल नाक्यावर आकारण्यात येणाऱ्या शुल्काची वैधता ही १२ तास असते. त्याच प्रमाणे सिटी सेंटर मॉलच्या वाहनतळाची वैधता सुद्धा १२ तासची असणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी मुकेश शेवाळे, अमोल नाईक, विशाल डोके, डॉ. संदिप चव्हाण, राहुल कमानकर, दीपक पाटील, निलेश कर्डक, हर्षल चव्हाण, सुनिल घुगे, करण आरोटे, अक्षय पाटील, अक्षय परदेशी, अक्षय राऊत, शुभम डोके, सागर चौधरी आदींसह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.