मुंबई – राज्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यांना फटका बसला आहे. घरे आणि शेतीचे मोठे नुकसान झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट सज्ज झाली असून पूरबाधितांसाठी जीवनावश्यक वस्तुंचे १६ हजार कीट्स पाठविण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ते म्हणाले की, घरगुती भांड्याचे एकूण २० हजार कीट्स व पांघरूणांचे २० हजार कीट्स यांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट ट्रस्टतर्फे निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात यापैकी १६ हजार कीट्सचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये रत्नागिरी-५०००, रायगड-५०००, सिंधुदुर्ग-५००, कोल्हापूर-२०००, सातारा-१०००, सांगली-२००० असे जिल्हानिहाय वाटप होणार आहे, तसेच घरगुती भांडी, पांघरुण साहित्य, बिस्कीट व टोस्ट यांचे कीट्स इ. विविध सामग्री पुरग्रस्तांसाठी येत्या दोन ते तीन दिवसांत तातडीने रवाना केली जाणार आहे.
पूरग्रस्तांच्या आरोग्याचा विचार करून २५० डॉक्टरांची पथके बाधित गावांमध्ये कॅम्प आयोजित करून रुग्णांची तपासणी, उपचार आणि औषधांचे वाटप करणार आहेत. पुरामुळे निर्माण झालेले रोग उदा. ताप, सर्दी, खोकला, उलटी आदींसाठी औषधे पुरवली जाणार आहेत. तसेच १ लाख वाटप कोरोना प्रतिबंधक मास्कचा पुरवठा केला जाईल. याशिवाय पूरग्रस्त भागात ५ अॅम्ब्युलन्स पाठवल्या जाणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.