नाशिक – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वागतासाठी भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी शहरातील जागोजागी अनधिकृत होल्डिंग लावले आहे. यावर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी संताप व्यक्त करत नाशिक महापालिका होल्डिंग बाबत भाजपाला न्याय तर राष्ट्रवादीवर अन्याय करत असल्याचे आरोप केले. अनधिकृत होल्डिंग लावल्यामुळे आमदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा नाशिक दौरा असतांना शहर विद्रुपीकरण होऊ नये याकरिता पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरात होल्डिंग लावले नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी भवन या पक्ष कार्यालयात येणार असल्याने काही कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या खाजगी आवारात स्वागत फलक लावले होते. परंतु नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने तातडीने ते फलक हटविले. यावर शांततेची भूमिका घेत व कार्यकत्यांनी स्वागत फलक काढले. परंतु आता महापालिकेत सत्ता असणाऱ्या पक्षातील नेत्यांच्या स्वागताचे फलक त्याच पक्षातील आमदाराने लावल्याने नाशिक महापालिकेतील अतिक्रमण विभागाने कुठलीही कारवाई न केल्याने तसेच लावलेले फलक सुद्धा न हटविल्याने राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी संताप व्यक्त केला आहे. नाशिक महापालिका ही महापालिकेत सत्ता असणाऱ्या पक्षाला झुकते माप देते का आमदारांना असा सवाल उपस्थित करत भाजपाला न्याय तर राष्ट्रवादीवर अन्याय करत असल्याचे आरोप महापालिकेवर केले आहे. यावेळी आमदार सीमा हिरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील यांनी केली. युवक राष्ट्रवादी विरोध करत असल्याचे बघता भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी स्वागत फलक लावल्यानंतर महापालिका प्रशासनावर दबाव देत परवनागी घेतली. यानंतर लावलेल्या होल्डिंगवर परवानगी क्रमांक टाकण्यात आले.