नाशिक – उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नाशिकच्या दौ-यावर असून त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमाचे उदघाटन व बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकच्या या कार्यक्रमात अजित पवार यांच्यावर सीबीआय चौकशीचे सावट आहे तर पुणे येथे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात झालेल्या गर्दीमुळे पदाधिका-यांवरच गुन्हे दाखल झाल्यामुळे नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांमध्ये ती भीती आहे. तर दुसरीकडे मित्र पक्षांना फारसे महत्त्व या कार्यक्रमात न दिल्यामुळे त्यांच्यातही नाराजीचा सूर आहे. एकुणच या कार्यक्रमात नाराजी व भीतीचे वातावरण आहे.
बुधवारीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी वाजेच्या पत्रावरुन अजित पवार व अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली. त्यामुळे त्याचे पडसाद राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीतही उमटले. या चौकशीच्या मागणीनंतर नाशिक येथे अजित पवार यांचा हा पहिला दौरा होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर चौकशीचे सावट आहे. तर दुसरीकडे पुणे येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात गर्दी झाल्यामुळे येथे पोलीसांनी पदाधिका-यांवर गुन्हे दाखल केले. त्यामुळे नाशिकच्या कार्यक्रमात सुध्दा असे गुन्हे दाखल होऊ शकतात म्हणून पदाधिका-यांमध्ये भीती आहे.
आज पवार यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम आहे. सकाळी ८ वाजता त्यांचे ओझर विमातळावर आगमन , त्यानंतर त्यांच्या उपस्थितीमध्ये देवळाली विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा, उधोजी मराठा बोर्डिंग कॅम्पसमध्ये विविध कार्यक्रम, या सह राज्यस्तरीय पीक स्पर्धेचा निकाल, स्वच्छ ग्राम स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा, याबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना व खरीप आढावा बैठक ते घेणार आहे. सिन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार अॅड. माणिकराव कोकटे यांची मुलगी व जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी यांच्या विवाहसोहळ्या निमित्त आयोजित स्वागत समारंभाला ते उपस्थितीत राहणार आहे.दहा तासाच्या या दौ-यानंतर ते सायंकाळी ६ वाजता ओझर विमानतळावरुन पुणे येथे रवाना होणार आहे.