मुंबई – केंद्रातील भाजप सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले असतानाही जनआशिर्वाद यात्रा काढत आहे. या जन आशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने भाजपची पोलखोल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरली असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते आजपासून राज्यातील विविध जिल्हयात पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली. वाढती महागाई, बेरोजगारी, पेट्रोल-डिझेल गॅसची दरवाढ, कोरोना काळात आलेले अपयश, पेगॅससच्या माध्यमातून केलेली हेरगिरी या सर्व गोष्टींचा उहापोह या पत्रकार परिषदेत केला जाणार आहेच शिवाय ओबीसी व मराठा आरक्षणात केंद्रसरकार कशी चालढकल करुन राज्यात तेढ निर्माण करत आहे हेही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो हे आज संध्याकाळी ५ वाजता वसई येथे तर जयदेव गायकवाड हे औरंगाबाद येथे आज संध्याकाळी ५ पत्रकार परिषद घेणार आहेत. तर दिनांक २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४ वाजता राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे हे अलिबाग येथे, दिनांक २४ ऑगस्ट रोजी प्रवक्ते संजय तटकरे हे रत्नागिरी येथे संध्याकाळी ५ वाजता तर सिंधुदुर्गातील कणकवली येथे प्रवक्ते अंकुश काकडे हेही संध्याकाळी ५ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी त्या – त्या जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, आजी माजी- आमदार त्यांच्यासमवेत उपस्थित राहणार आहेत.