नाशिक – केंद्र सरकारने वाढवलेल्या घरगुती गॅसच्या किंमती, इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख नेत्यांसह नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सत्तेत येण्यापूर्वीचे भाषण चालवत उपहासात्मक आंदोलन केले. याप्रसंगी प्रदेश पदाधिकारी माजी खासदार देविदास पिंगळे, नानासाहेब महाले, दिलीप खैरे, अशोक सावंत, गजानन शेलार, बाळासाहेब कर्डक, कविता कर्डक, हरीश भडांगे, जगदीश पवार, अनिता भामरे, अंबादास खैरे, संजय खैरनार, गौरव गोवर्धने, धनंजय निकाळे, सलीम शेख, सोनिया होळकर, डॉ.अमोल वाजे, धनंजय रहाणे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे अनेकांचे रोजगार बुडाले असून अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. अनेकांना जगणे मुश्कील झाले असून इंधनाच्या वाढत्या किमतींनी जनता हैराण झाली आहे. अशा जीवघेण्या परिस्थितीत केंद्र सरकार दिवसेंदिवस इंधनासह गॅस सिलेंडरच्या किमतीत भरमसाठ वाढ करत आहे. केंद्र सरकारने अचानक सिलेंडरचे दर २५.५० रुपयांनी वाढविले असून दीडवर्षापासून मिळणारी सबसिडी हि केंद्र सरकारने बंद केली आहे. केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे पेट्रोल सेंच्युरीपार गेले असून डिझेलच्या किमतीनेही उच्चांक गाठला आहे. यातच देशातील प्रत्येक घरात लागणाऱ्या गॅस सिलेंडरचे दरही केंद्र सरकारने वाढविले आहे. डिसेंबरनंतर गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेली ही सहावी दरवाढ आहे. त्यामुळे सिलिंडरच्या किमतींनी उच्चांकी स्तर गाठला आहे. इंधन दरवाढीमुळे अक्षरश: सर्वसामान्यांचे कंबरडं मोडलं आहे. आधीच खाद्य तेलाच्या आणि पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. मोदींच्या केंद्र सरकारमुळे वाढलेल्या महागाईनं व इंधन दरवाढीनं सर्वसामान्यांचे व गृहिणींचे बजेट कोलमडून पडलं आहे. अशामध्ये आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ झाली आहे. इंधन दरवाढीसह अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ होत असून महागाईमुळे अनेकांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.
या आंदोलनात राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.