नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान 2 फेब्रुवारी ते 30 मार्च 2025 या कालावधीत जनतेसाठी खुले राहणार आहे. उद्यानाच्या देखभालीचा सोमवार हा वार वगळता, आठवड्यातील इतर वारी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत लोक उद्यानाला भेट देऊ शकतात. उद्यान 5 फेब्रुवारी (दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानामुळे), 20 आणि 21 फेब्रुवारी (राष्ट्रपती भवनातील अभ्यागत परिषदेमुळे) आणि 14 मार्च (होळीमुळे) बंद राहील.
भेट देणाऱ्या सर्वांसाठी प्रवेश आणि निर्गमन प्रेसिडेंट्स इस्टेटच्या प्रवेशद्वार क्रमांक 35 मधून होईल, जे नॉर्थ अॅव्हेन्यूपासून राष्ट्रपती भवनाच्या जवळ आहे.अभ्यागतांच्या सोयीसाठी, सेंट्रल सेक्रेटरीएट मेट्रो स्टेशन ते प्रवेशद्वार क्रमांक 35 दरम्यान शटल बस सेवा दर 30 मिनिटांनी सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध असेल.
अमृत उद्यान पुढील दिवशी विशेष श्रेणींसाठी खुले राहील:
26 मार्च – दिव्यांग व्यक्तींसाठी
27 मार्च – संरक्षण, निमलष्करी आणि पोलिस दलातील कर्मचाऱ्यांसाठी
28 मार्च – महिला आणि आदिवासी महिला स्वयंसहायता गटांसाठी
29 मार्च – ज्येष्ठ नागरिकांसाठी
उद्यानासाठी नोंदणी आणि प्रवेश विनामूल्य आहे. नोंदणी https://visit.rashtrapatibhavan.gov.in/.येथे करता येईल. आयत्या वेळेस प्रवेशही मिळू शकेल.
राष्ट्रपती भवनात 6 ते 9 मार्च 2025 दरम्यान ‘विविधता का अमृत महोत्सव’आयोजित केला जाणार आहे. या वर्षीच्या महोत्सवात दक्षिण भारतातील समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि वैशिष्ट्यपूर्ण परंपरांचे दर्शन घडेल.