नाशिक – आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकावार आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील या दौऱ्यात रविवार ३० जानेवारी रोजी चांदवड येथे पालकमंत्री ना.छगनराव भुजबळ हे मार्गदर्शन करणार आहेत.
या जिल्हा दौऱ्यात मंगळवार २५ जानेवारी रोजी येवला तालुका व शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसची आढावा बैठक येवला येथे संपन्न झाली असून रविवार ३० जानेवारी रोजी चांदवड-देवळा विधानसभा मतदार संघाची बैठक दुपारी १ वाजता चांदवड येथे जिल्हा बँकेच्या सभागृहात पालकमंत्री ना.छगनराव भुजबळ यांच्या उपस्थितीत होणार आहे. सोमवार ३१ जानेवारी रोजी मालेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसची आढावा बैठक सकाळी ११ वाजता मालेगाव येथील शासकीय विश्रामगृह सभागृहात होणार आहे. तर दुपारी ३ वाजता सटाणा येथील राधाई मंगल कार्यालयात बागलाण विधानसभा मतदार संघाची आढावा बैठक होणार आहे. बुधवार दि. ०२ फेब्रुवारी रोजी लासलगाव येथे निफाड पूर्व तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसची आढावा बैठक होणार आहे.
आगामी काळात होत असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी पक्षाने बैठकांचा धडाका सुरु केला असून त्याचाच भाग म्हणून प्रत्यक्ष तालुकावार जाऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात येतील असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांनी सांगितले आहे. या दौऱ्यात पक्षाचे जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी, सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष सहभागी होणार आहेत. या बैठकांना स्थानिक नेते, आजी-माजी आमदार, सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, जयदत्त होळकर, यशवंत शिरसाट, संदीप पवार, शैलेश सूर्यवंशी, भाऊसाहेब भवर, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, प्रकाश शेळके, दिलीप आहेर आदींनी केले आहे.