कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिद्द असेल तर कुठलेही यश अशक्य नाही. त्यातही जर मुलींनी ही जिद्द बाळगली तर जे यश मुलांना शक्य नाही, त्याला गवसणी घालणे त्यांना शक्य आहे. इंचलकरंजीच्या एका मुलीने वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत सीएसच्या परीक्षेत देशात अव्वल स्थान पटकावले आहे.
इचलकरंजी येथील राशी अमृत पारख या तरुणीने सीएस (कंपनी सेक्रटरी) या परीक्षेत ९०० पैकी ५५३ गुण संपादन केले आणि देशात अव्वल स्थान पटकावले. दि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने यावर्षी जूनमध्ये ही परीक्षा घेतली होती. यातील व्यावलायिक परीक्षेत राशीने हे यश संपादन केले आहे. परीक्षेचा निकाल अलीकडेच जाहीर झाला आहे. दररोज सात तास अभ्यास, स्वतःचे नोट्स काढणे, स्वयं अध्ययनावर भर देणे, सराव नियमीत करणे आणि ऑनलाईन वर्गातून मार्गदर्शन प्राप्त करणे हे आपल्या यशाचे सूत्र ठरले असे ती म्हणते.
परीक्षेच्यादरम्यान मानसिक तणाव आल्याने तब्येत बिघडली. पण, या परीक्षेत यश मिळविण्याची जिद्द सोडली नाही. तिने कुटुंबीयांच्या पाठबळावर परीक्षा दिली. याचा खूप आनंद होत आहे, अशी भावना राशी हिने दिली. माझ्या यशात कुटुंबीय, शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे. सीएस म्हणून काम करताना कायदा अभ्यासदेखील असावा लागतो. त्यामुळे आता मी तीन वर्षांच्या ‘लॉ’ अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार असल्याचे ती म्हणते.
दहा तास अभ्यास
ती परीक्षेआधी दोन महिने दिवसाकाठी ७ ते १० तास अभ्यास करत होती. या तयारीच्या जोरावर तिने देशात अव्वलस्थान पटकाविले आहे. तिचे शालेय शिक्षण इचलकरंजीतील न्यू मिलिनिअम पब्लिक स्कूल, तर महाविद्यालयीन शिक्षण श्रद्धा ज्युनिअर कॉलेजमधून झाले. व्यंकटेश महाविद्यालयातून ती पदवीचे शिक्षण घेत आहे. तिच्या आई सीमा या गृहिणी, तर बहीण तन्वी आणि भाऊ जिनय शिक्षण घेत आहेत.
Rashi Parakh All India 1st Rank CS Exam ICSI
Ichalkaranji Study Company Secretary