नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकेश्वर ग्रामीण भागातील दळणवळण वाढविण्याकरिता खासदार गोडसे यांच्याकडून शासन दरबारी सुरु असलेल्या प्रयत्नांना यश येत आहे. पेठ-तोरंगण हरसुल-वाघेरा-अंबोली- त्र्यंबकेश्वर-घोटी या दरम्यानच्या ठिकठिकाणच्या रस्ता दुरुस्ती करण्याच्या कामाची स्थगिती खासदार गोडसे यांनी उठविली आहे. पेठ- त्र्यंबकेश्वर -घोटी या रस्ता दुरुस्तीसाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असून लवकरच रस्ता दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली आहे. पेठ- त्र्यंबकेश्वर-घोटी या रस्त्याची दुरुस्ती होणार असल्याने त्र्यंबकेश्वर तालुका वासियांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पेठ -त्र्यंबकेश्वर–घोटी या रस्त्याची गेल्या काही वर्षांपासून मोठया प्रमाणावर दुरावस्था झालेली आहे. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दळणवळण मंदावून पंचक्रोशीतील व्यापारांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झालेला आहे. सदर रस्त्याची दुरुस्ती होण्यासाठी त्र्यंबकेश्वर तालुका वासियांकडून खासदार गोडसे यांच्याकडे सतत आग्रही मागणी होत होती. खासदार गोडसे यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन वरील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन घेतला होता. परंतु सदर कामाला चार महिन्यांपूर्वी शासनाने स्थगिती दिली होती. सदर रस्त्याच्या कामावरील स्थगिती उठविण्यासाठी खासदार गोडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली होती. खासदार गोडसे यांची मागणी न्यायिक असल्याने शासनाने आज पेठ – त्र्यंबकेश्वर – घोटी या रस्त्याच्या कामावरील स्थगिती उठविली असल्याचे आदेश काढले आहे. यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी आता पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असून लवकरच प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली आहे.