नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रावतभाटा इथे असलेल्या राजस्थान अणुऊर्जा प्रकल्प – आरएपीपी 7 व 8 या 2 X 700 मेगावॅट क्षमतेच्या अणुभट्ट्यांपैकी एक – युनिट 7 अणुभट्टीने 19 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 10 वाजून 42 मिनिटांनी, आण्विक ऊर्जा नियामक मंडळ -एईआरबीने दिलेल्या मंजुरीनंतर, ‘क्रिटिकॅलिटी’चा महत्त्वाचा टप्पा गाठला. अणुभट्टीत अणुकेंद्राच्या विभाजनाच्या नियंत्रित प्रक्रियेला सुरुवात होते त्या टप्प्याला ‘क्रिटिकॅलिटी’ असे म्हणतात.
देशात उभारण्यात येत असलेल्या देशी बनावटीच्या प्रत्येकी 700 मेगावॅट क्षमतेच्या 16 प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिअॅक्टर (पीएचडब्ल्यूआर)च्या मालिकेतील तिसरी भट्टी आरएपीपी-7 ही आहे. पहिल्या दोन प्रत्येकी 700 मेगावॅट क्षमतेच्या पीएचडब्ल्यूआर – गुजरातेतील काक्रापार इथे असलेल्या केएपीएस 3 व 4 (2 X 700 मेगावॅट) – च्या यशस्वी कार्यान्वयनानंतर आता आरएपीपी-7 ने क्रिटिकॅलिटीचा टप्पा गाठल्यामुळे ‘एनपीसीआयएल’ने 700 मेगावॅट क्षमतेच्या या देशी बनावटीच्या अणुभट्टीचे आरेखन, बांधकाम आणि कार्यान्वयन यात परिपक्वता गाठल्याचे सिद्ध केले आहे.
प्रकल्पाच्या समयरेषेवर पहिल्यांदा क्रिटिकॅलिटी गाठण्याचा टप्पा हा अणुभट्टीचे बांधकाम पूर्ण होऊन कार्यान्वयन सुरू झाल्याचे चिन्ह आहे. अणुभट्टीला ग्रिडशी जोडण्यापूर्वी आता विविध प्रयोग/चाचण्या केल्या जातील. त्यानंतर एईआरबीच्या मंजुऱ्या मिळत जातील तसतशी टप्प्याटप्प्याने अणुभट्टीतून वीजनिर्मितीची क्षमता वाढवून पूर्णत्वाकडे नेली जाईल.
राजस्थानातील रावतभाटा इथे 1180 मेगावॅट क्षमतेच्या सहा अणुभट्ट्या कार्यरत असून त्यात आता आरएपीपी-7 व 8 ची भर पडत आहे. आरएपीपी-7 मधून या वर्षी ऊर्जानिर्मितीला सुरुवात होणे अपेक्षित असून आरएपीपी-8 मधून पुढच्या वर्षी अपेक्षित आहे. एनपीसीआयएल सध्या एकूण 8180 मेगावॅट क्षमतेच्या 24 अणुभट्ट्या चालवत असून 6800 मेगावॅट क्षमतेच्या, आरएपीपी-7 सह आठ अणुभट्ट्यांचे बांधकाम सुरू आहे. तसेच, एकूण 7000 मेगावॅट क्षमतेच्या आणखी 10 अणुभट्ट्यांसाठी प्रकल्पपूर्व प्रक्रिया सुरू आहेत. त्या 2031-32 पर्यंत पूर्णत्वाला येणे अपेक्षित आहे.