नाशिक – लग्नाचे आमीष दाखवून दिव्यांग मुलीवर एकाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात शुभम सुनील चांडोले (रा. तलाठी कॉलनी, दिंडोरीरोड) याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार संशयित शुभम चांडोले याने फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान कापडबाजार येथील घरात दोन वेळा अत्याचार केला. संशयित शुभम याने स्वत: विवाहित असल्याची बाब लपवून पीडितेस लग्नाचे आमीष दाखवून प्रेमसंबंध ठेवून अत्याचार केला. त्यातून पीडिता सात महिन्यांची गर्भवती झाली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस तपास करीत आहेत.
पोलिसास चौघांची मारहाण
कौटुंबिक कारणातून मारहाण करणाऱ्या चौघांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाेलिसास चौघांनी मारहाण करीत दुखापत केल्याची घटना काझीपुरा परिसरात घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयित संजय दामोदर कमोद (५०), अनिल दामोदर कमोद (५५), अक्षद अनिल कमोद (२५) व सिद्धार्थ संजय कमोद (२३, सर्व रा. काझीपुरा) यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अंमलदार मुजाहिद मेहमूद सय्यद (२९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चौघे संशयित त्यांच्या नातलग लता सुनील कमोद (रा. काझीपुरा) यांच्या घरी गेले व लता यांच्या मुलाकडे रहिवासी पुराव्याचे कागदपत्र मागून मारहाण केली. मुजाहिद यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला असता चौघांनी मिळून त्यांना मारहाण करीत त्यांच्या हाताचे बोट फ्रॅक्चर केले. याप्रकरणी भद्रकाली पोलिस तपास करीत आहेत.
युवतीची गळफास घेऊन आत्महत्या
गंगापूर शिवारात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळून आला. तेजस बळवंत देसाई (२२, रा. अशोकनगर, सातपूर) याने गंगापूर पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार गंगापूर शिवारातील अवधूत डोंगरावरील एका झाडाला शनिवारी (दि.२७) सायंकाळच्या सुमारास २५ ते ३० वयोगटातील युवकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.