आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण
नाशिक– रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन हिल्सने दत्तक घेतलेल्या इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथे शासन निधी व सी एस आर मधून ४९ लाख रुपये खर्चून प्रशस्त अशी दुमजली क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले अभ्यासिका उभारण्यात आली आहे.तसेच या व्यतिरिक्त अभ्यासिकेत सुसज्ज अशी बैठक व्यवस्था व कपाटांसाठी सात लाख तर फर्निचर आणि इतर बाबींवर दोन लाख रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती क्लबचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी दिली.
आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना यूपीएससी, एमपीएससी तसेच अन्य स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण या अभ्यासिकेत देण्यात येणार असून यामुळे या परिसरातील मोडाळे शिरसाटे, कुसेगाव,मुरंबी वाडीवरे आदि आदिवासी व सर्व गटातील विद्यार्थ्यां चा शासकीय अधिकारी बनण्याचा मार्गही खुला होणार आहे. रोटरी क्लब नाईन हिल्सचे एक सदस्य रोटे.हर्षद बेळे हे लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले असून त्यांची कनेक्ट इंडिया आयएएस प्रशिक्षण संस्था तसेच सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी प्रतापराव दिघावकर यांच्या अधिकाऱ्यांची टीम मोडाळे येथील अभ्यासिकेत येऊन आदिवासी विद्यार्थ्यांचा विविध स्पर्धा परीक्षांसाठी सराव करून घेणार आहे.मोरंबी,शिरसाठे, कुशेगाव,आणि परिसरातील संलग्न गावांतील आदिवासी विद्यार्थ्यांना त्याचा चांगला लाभ होणार आहे.मोडाळे येथील अभ्यासिका भविष्यात डिजिटल करण्यात येणार असून अद्ययावत पुस्तकेही तेथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.तसेच स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेली सर्व पुस्तकेही या अभ्यासिकेत पुरविण्याचा मानस असल्याचे धनंजय बेळे यांनी नमूद केले.मोडाळे आणि आसपासच्या गावांतील ५००० हून अधिक माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनाही या अभ्यासिकेचा लाभ घेता येणार असून त्यामुळे त्यांच्यातही आनंदाचे वातावरण आहे.अंजनेरीच्या मागे असलेल्या या परिसरात किष्किंधा नगरी होती अशी आख्यायिका आहे. नासिक जिल्ह्यातील पहिली वाईनरीही येथेच स्थापित झाल्याचे सांगण्यात येते.या सर्व बाबींमुळे या भागाला विशेष महत्व प्राप्त झाले असे म्हटले तर ते निश्चितच वावगे ठरणार नाही.
नुकतेच छत्रपती युवराज संभाजी राजे यांच्या हस्ते या अभ्यासिकेच्या लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी अत्यंत आनंदमय वातावरणामध्ये ही अभ्यासिका सुपूर्द करत असताना त्यांनीही या कार्याचे तोंड भरून कौतुक केले व अशा पद्धतीने रोटरी क्लब ने व इतरही संस्थांनी पुढे येऊन दुर्लक्षित आणि दुर्गम भागात असलेल्या विद्यार्थ्यांकरता तसेच गावांकरता आपला निधी उभा करून अशा पद्धतीचे काम केले पाहिजे असे उद्गार यावेळेस त्यांनी काढले.
या अभ्यासिकेच्या उभारणी करता सहकार्य लाभलेल्या सर्व उद्योगांचे व शासकीय अधिकाऱ्यां चा यावेळी सन्मान करण्यात आला,
या अभ्यासिकेमध्ये ८० मुले व ८० मुली एकाच वेळी बसू शकतील अशा पद्धतीची व्यवस्था आहे. पुस्तकांसाठी स्वतंत्र दालन तसेच प्रत्येकाला स्वतंत्ररित्या बसता येईल व एकमेकांशी संपर्क टाळता येईल अशी फर्निचरची व्यवस्था करण्यात आली आहे, पुस्तके ठेवण्यास तसेच देवघेवसाठीही स्वतंत्र विभाग आहे. वातावरण प्रसन्न राहील यासाठी लख्ख प्रकाश तसेच खेळती हवा राहावी म्हणून पंख्यांची व्यवस्थासुद्धा अभ्यासिकेत करण्यात आली आहे.