ऊस उत्पादक, कामगार, व्यवसायिकांना येणार सुगीचे दिवस…
पिंपळगाव बसवंत: कर्मवीरांच्या त्यागातून उभा राहिलेल्या व गेल्या सहा वर्षांपासून बंदावस्थेत असलेला निफाड तालुक्यातील कर्मवीर काकासाहेब वाघ रानवड सहकारी साखर कारखाना येत्या रविवारी दि. १४ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष सुरू होणार असल्याने तालुक्यातील कारखादारी बंदमुळे मंदावलेले आर्थिक चक्र पुन्हा गतिमान होणार आहे. सहकारातुन समृद्धीकडे या उक्तीप्रमाणे निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्या अधिपत्याखाली असलेल्या अशोकराव बनकर पतसंस्थेच्या माध्यमातून रानवड कारखाना उभारी घेत असल्याने तालुक्यातील ऊस उत्पादक, ऊस तोड कामगार, वाहतूकदारांसह स्थानिक व्यवसायिकांना पुन्हा सुगीचे दिवस येणार आहे.
हिरवाईने नटलेल्या व सुजलाम-सुफलाम म्हणून ओळख प्राप्त केलेल्या निफाड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. दिला शब्द, केला पूर्ण ही खासियत असलेल्या आमदार दिलीप बनकर यांनी दोन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीवेळी रासाका सुरू करण्याचा दिलेला शब्द गत संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर बॉयलर पेटवून पूर्ण केल्याने दिवाळीपूर्वीच निफाड तालुक्यात आनंदासह नवं चैतन्याचे वातावरण पसरले होते. तर येत्या १४नोव्हेंबर रोजी गव्हाणीत उसाची मोळी टाकून प्रत्यक्ष रानवड सहकारी साखर कारखाना सुरू होणार असल्याने तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी- कामगारांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार आहे.
निफाड तालुक्यात सहा वर्षांपासून बंदावस्थेत असलेला कर्मवीर काकासाहेब वाघ रानवड सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी आमदार दिलीप बनकरांनी शासनदरबारी जीवाचे रान केले. निफाडची कारखानदारी सुरू करण्यासाठी वेळप्रसंगीक बैठका घेत अडी-अडचणींचा सामना केला. शासन स्तरावरून कायद्यात बदल करून घेत महाराष्ट्र शासनाने स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्थेला पुढील १५ वर्षांसाठी रानवड कारखाना भाडेतत्त्वावर सुरू करण्याची परवानगी दिली. गेल्या वर्षभरापासून तालुक्याचे आमदार दिलीपराव बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना चालू गळीत हंगामात पूर्ण तयारीनिशी चालू होण्याकरिता कारखाना कार्यस्थळावर गेल्या वर्षभरापासून विविध प्रकारची सुरू असलेली कामे पूर्णत्वास आलीअसल्याने कारखाना १४नोव्हेंबर रोजी सुरू होणार असल्याने तालुक्यातील ऊस उत्पादक, ऊसतोड मजूर, वाहतूकदार, स्थानिक व्यवसायिकांत समाधानाचे वातावरण आहे.
शरद पवार यांची उपस्थिती….
रानवड कारखान्याचा ३९व्या गळीत हंगामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शुभहस्ते, तर पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि.१४ रोजी होत आहे. याप्रसंगी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, कृषिमंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, जि प अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार असल्याने तालुक्यातील ऊस उत्पादक, शेतकरी कामगार नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार दिलीप बनकर, यांच्यासह स्व अशोकराव बनकर पतसंस्थेचे चेअरमन रामभाऊ माळोदे, जन. संचालक गणेश बनकर यांनी केले आहे.
समाधानाचे वातावरण…….
गेल्या सहा वर्षांपासून बंदावस्थेत असलेला रानवड कारखाना सुरू होणार असल्याने कारखाना कार्यस्थळावर वाहनांची रेलचेल, ऊस उत्पादकांची गर्दी, कामगारांची धावपळ पुन्हा वाढू लागल्याने कारखाना कार्यक्षेत्रातील व्यवसायिकांत समाधानाचे वातावरण आहे.
उपप्रकल्पांना गती…
रानवड कारखान्यात दररोज १२५० मेट्रिक टन उसाचे गाळप होणार असून तीन लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. शिवाय कारखान्यात बायोगॅस,डिसलेरीसह इथेनॉलच्या प्रकल्पाचे काम देखील अंतिम टप्प्यात आले असून डिसलेरीसह इथेनॉलची ५० हजार पर डे लिटरची क्षमता आहे. तर आजपोवतो तीन ते साडे तीन लाख हेक्टर उसाची नोंद करण्यात आली असून कारखाना प्रत्यक्ष सुरू झाल्यावर दिवसाकाठी १८०० ते २००० मेट्रिक टन उसाचा पुरवठा होणार आहे.