नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उद्यापासून २३ ते २६ जानेवारी २०२५ दरम्यान पासून सुरु होणाऱ्या रणजी ट्रॉफीच्या सामन्यासाठी महाराष्ट्र व बडोदा हे दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – तर्फे, हा चार दिवसीय सामना नुकतेच नूतनीकरण झालेल्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब नाशिक येथे होत आहे.
आज महाराष्ट्र व बडोदा या दोन्ही संघांनी सकाळपासूनच साधारण ३ एक तास कसून सराव केला. महाराष्ट्र संघाचे ९ वाजताच मैदानावर आगमन झाले. संपूर्ण संघाने आधी थोडावेळ हिरवळीवर फुटबॉलचा आनंद घेतला. त्यानंतर मुख्य प्रशिक्षक हर्षद खडीवाले व सहाय्यक प्रशिक्षक अमित पाटील यांच्या बरोबर कर्णधार ऋतुराज गायकवाड सह इतर फलंदाज व सर्वच गोलंदाजांनी सराव केला.
दहाच्या आसपास बडोदा संघाने हि सरावास सुरुवात केली. मुख्य प्रशिक्षक मुकुंद परमार , गोलंदाजी प्रशिक्षक अरविंद श्रीनाथ, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक हिमांशू जाधव व कर्णधार कृणाल पंड्या यांनी संघाबरोबर आज दुसऱ्या दिवशी देखील व्यवस्थित सराव केला. असे महाराष्ट्र व बडोदा दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. सर्वच क्रिकेट रसिक या रणजी ट्रॉफी सामन्याची आतुरतेने वाट पहात आहेत. सकाळी ८.३० वाजता सामन्याचे उद्घाटन होईल. याप्रसंगी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार, सेक्रेटरी कमलेश पिसाळ,
विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम , जिल्हाधिकारी जलज शर्मा , मनपा आयुक्त मनीषा खत्री , खासदार राजभाऊ वाजे , आमदार देवयानी फरांदे , सीमाताई हिरे व राहुल ढिकले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या सामन्यासाठी संदीप विद्यापीठ, सपट निरावी चहा, अशोका बिल्डकॉन, एलोरा इन्फ्रास्ट्रक्चर, ए सी जैन बिल्डर, इंडियन ऑईल, जे एच बि भारत गॅस, जीनेश्वर कन्सट्रकशन , नाशिक पेट स्कॅन, श्री जी बिल्डर, वॉटरग्रेस, दि एव्हेन्यू यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
सरावा दरम्यान नाशिकच्या खासकरून युवा क्रिकेटरसिकांचा जोरदार उत्साह बघावयास मिळाला. आज देखील बडोदा संघ कर्णधार कृणाल पंड्याने मैदानाच्या सीमारेषेवरील चाहत्यांना सेल्फीचा आनंद घेऊन दिला. महाराष्ट्र संघातील नाशिकचे सत्यजित बच्छाव, मुर्तुझा ट्रंकवाला व रामकृष्ण घोष यांना सराव करतांना बघून चाहते खूष झाले. चाहत्यांच्या अमाप, अनावर उत्साहामुळे ऋतुराज गायकवाड व कृणाल पंड्या यांना गाडी पर्यत पोहचण्यासाठी अलोट गर्दीतून वाट काढावी लागली.
सामना बघण्यासाठी मोफत सुविधा राहणार असून त्र्यंबक रोड वरील सिव्हिल हॉस्पिटल समोरील मुख्य द्वार तसेच गेस्ट हाऊस कडील द्वाराने मैदानावर प्रवेश करता येणार आहे. पार्किंग साठी ईदगाह मैदानाचा वापर करता येणार आहे.आतापर्यत फक्त परदेशात्त उपलब्ध असलेल्या लॉन वर बसून सामना बघण्याची सोय आता नाशिककरांना देखील झाल्यामुळे रसिकांना या खास टेकडावरील हिरवळीवर बसून सामना बघण्याचा आनंद लुटता येणार आहे.
या रणजी ट्रॉफीच्या सामन्यासाठी बीसीसीआय तर्फे व्ही नारायणकुट्टी ( आंध्र ) हे सामनाधिकारी आहेत. प्रथेनुसार दोन्ही संघांच्या कर्णधारां बरोबर त्यांची बैठक झाली. तर पंच म्हणून क्रिशनेंदू पाल ( बंगाल ) व निखिल पटवर्धन ( इंदोर ) हे जबाबदारी पार पाडतील. बीसीसीआयचे गुणलेखक म्हणून केतकी जामगावकर व किशोर लवाणे हे दोघे काम बघतील. तर बीसीसीआयचे व्हीडीओ विश्लेषक आहेत नाशिकचे सागर देशमुख , यांना सदानंद प्रधान साथ देतील. बीसीसीआयचे ए सी ओ आहेत सुयोग चौधरी.